भुसावळ तहसीलदारांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:43 PM2019-09-06T12:43:54+5:302019-09-06T12:44:19+5:30

लाभार्थी रेशनवरील धान्याच्या लाभापासून वंचित

Notice to Bhusawal Tehsildar | भुसावळ तहसीलदारांना नोटीस

भुसावळ तहसीलदारांना नोटीस

Next

जळगाव : वरणगाव येथील मजूर वस्तीतील लोकांची रेशनकार्डसाठीची माहिती तहसील कार्यालयाकडून अपलोड न झाल्याने या लोकांना रेशनवरील धान्याच्या लाभापासून वंचीत रहावे लागत आहे. त्याबाबत बुधवारी झालेल्या ‘दिशा’च्या बैठकीत तक्रार होताच जिल्हाधिकाऱ्यांनी भुसावळ तहसीलदारांंना नोटीस बजवण्याचे आदेश दिले.
बैठकीत पुरवठा विभागाकडील उज्ज्वला योजना व अन्य योजनांवर चर्चा सुरू असतानाच वरणगाव नगराध्यक्षांनी मजूर वस्तीतील लोकांना रेशनवरील धान्याचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा मांडला.
याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना विचारणा केली असता या कार्डधारकांची माहिती अपलोड झाली नव्हती.
भुसावळ तहसीलशी बोलणे झाले आहे. त्यांच्याकडून माहिती अपलोड करून लवकरच लाभ दिला जाणार असल्याचे सांगितले.
त्यावर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी भुसावळ तहसीलदारांचे काम असमाधानकारक असल्याचा शेरा मारत माहिती अपलोड करण्याचे काम प्रशासनाचेच असताना नागरिकांना फेºया का माराव्या लागत आहेत? असा सवाल करीत भुसावळ तहसीलदारांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
आमदार भोळेंनी केली अमृतच्या मक्तेदाराची तक्रार
बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी अमृत योजनेच्या मक्तेदराच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मक्तेदाराने उशीरा ऐन पावसाळ्यात काम सुरू केले. त्यामुळे खोदलेले रस्ते व पाऊस यामुळे चिखल होऊन नागरिकांचे खूप हाल झाले. तसेच मक्तेदाराने रस्ते तातडीने दुरूस्त करणे अपेक्षित असताना ते केले नाहीत. रिंगरोडसारख्या रहदारीच्या रस्त्यावर स्लॅब कल्व्हर्टचे काम दोन महिन्यांपासून रखडले असल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तुमच्या निविदेतच्या अटी-शर्र्तींमध्येच ही तरतूद नाही, असे मत मांडले. त्यावर आमदार भोळे यांनी जिल्हाधिकारी यांना ‘तुमची कुणीतरी दिशाभूल केली आहे. निविदेत तशी अट आहे.’ असे सांगितले. मनपा आयुक्त उदय टेकाळे यांनीही त्यास दुजोरा देत आधी काँक्रीटीकरणाची अट होती ती बदलून डांबरीकरणाची केली असल्याचे सांगितले.
हगणदरीमुक्तीवर जिल्हाधिकाºयांचेच प्रश्नचिन्ह
हगणदरीमुक्तीच्या विषयावर पदाधिकाºयांनी तक्रारी करताच, जिल्हाधिकाºयांनीही त्यास सहमती दर्शविली. रस्त्यावर जाणाºयांची संख्या मोठी आहे. सार्वजनिक शौचालयांची साफसफाई होत नाही. अनेक ठिकाणी तर शौचालयापर्यंत जायला रस्ताच नाही, अशी परिस्थिती आहे. भुसावळची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे काहीतरी नाविन्यपूर्ण मोहीम हाती घ्या तरच हगणदरीमुक्ती शक्य होईल, असे सांगितले.

Web Title: Notice to Bhusawal Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव