भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना नोटीस : ५० हजाराचा जातमुचलका, दोन प्रतिष्ठितांचा जामीन घेऊन हजर रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:35 PM2019-04-14T12:35:25+5:302019-04-14T12:36:50+5:30
कलमांमध्ये वाढ
अमळनेर : येथील भाजपा मेळाव्यात माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांना केलेल्या मारहाणीच्या घटनेचे दखल घेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह सात आरोपींना ५० हजाराचा जातमुचलका, दोन प्रतिष्ठांचा जामिन घेऊन हजर रहा असे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले होते मात्र ते हजर झाले नाही. रविवारी किंवा सोमवारी त्यांना हजर रहावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.
भाजप- शिवसेना युतीचा गेल्या १० रोजी अमळनेरात झालेल्या संयुक्त मेळाव्यात उदय वाघ यांच्यासह सात जणांनी डॉ. बी.एस. पाटील यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे. या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उदय वाघ यांच्यासह सातही आरोपींवर सीआरपीसी कलम १०७ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून अहवाल कार्यकारी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सादर केला आहे.
सात जणांना नोटीस
कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार ज्योती देवरे यांनी सातही आरोपीना नोटीस दिली आहे. त्यात म्हटले आहे की आपणाकडून सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये , निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच जनक्षोभ वाढू नये म्हणून आपणास ही नोटीस काढण्यात येत आहे. त्यामुळे सहा महिने मुदतीचा व ५० हजार रुपये किमतीच्या जातमुचलक्याचा व दोन प्रतिष्टीत व्यक्तींचा जामीन घेऊन कार्यकारी दंडाधिकारीच्या न्यायालयात हजर राहण्याचे सूचित केले आहे.
हजर झाले नाही
दरम्यान, वाघ यांना शनिवारीच हजर रहाण्याचे आदेश तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्यांनी दिले होते मात्र ते हजर झाले नाही. रविवारी किंवा सोमवारी त्यांना हजर राहून जामिन घ्यावा लागेल असे सूत्रांनी सांगितले.
कलमांमध्ये वाढ
दरम्यान, डॉ. बी.एस. पाटील यांना मारहाण प्रकरणी पूर्वी भादंवि कलम ३२३, १४३, १४७, १४९ प्रमाणे अमळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. डॉ. बी.एस. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल होता. मात्र डॉ. बी.एस. पाटील यांच्या नाकाला झालेले फ्रॅक्चर व लिव्हरला दुखापत झाल्याचे वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाल्याने दाखल गुन्ह्यातील कलमात वाढ करण्यात आली असून ३२५ कलम वाढविण्यात आले असल्याची माहिती अमळनेर पोलिसांनी दिली.