सत्ताधारी भाजपाच्या सात नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 07:25 PM2019-02-22T19:25:28+5:302019-02-22T19:30:24+5:30
मनपाच्या गुरुवारी झालेल्या महासभेत गैरहजर राहणाऱ्या सत्ताधारी भाजपाच्या सात नगरसेवकांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई करण्याचा हालचाली सुरू आहेत.
जळगाव - मनपाच्या गुरुवारी झालेल्या महासभेत गैरहजर राहणाऱ्या सत्ताधारी भाजपाच्या सात नगरसेवकांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई करण्याचा हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गैरहजर राहणाऱ्या सात नगरसेवकांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून खुलासे मागविले आल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.
गाळेधारकांवर लावलेला पाच पट दंडाची रक्कम रद्द करण्याचा ठराव गुरुवारी झालेल्या मनपा महासभेत घेण्यात आला. या ठरावावेळी शिवसेना सदस्य तटस्थ राहिले. यानंतरही बहुमताने हा ठराव भाजपाने मंजूर करून आणला. मात्र, या ठरावाच्या वेळी भाजपाश्रेष्ठींनी सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचा सूचना दिल्यावरदेखील सात नगरसेवक महासभेत गैरहजर राहिले. तर तीन नगरसेवकांनी महासभेच्या दिवशी रजा घेतली होती. त्यामुळे या नगरसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात नगरसेवक कांचन सोनवणे, गायत्री शिंदे, मीना सपकाळे, दत्तात्रय कोळी, चेतन सनकत, सुनील खडके व रेखा पाटील हे सात नगरसेवक गैरहजर होते. या नगरसेवकांकडून खुलासे मागविण्यात आले. हे खुलासे आमदार चंदूलाल पटेल यांच्याकडे देण्यात आले आहेत. गैरहजर राहणाऱ्या या नगरसेवकांना भाजपाकडून ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकण्याचेही संकेत देण्यात आले आहेत.