अतिवृष्टी अनुदान वाटपात दिरंगाई, चार तहसीलदारांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:33 AM2019-12-01T00:33:02+5:302019-12-01T00:33:41+5:30
एरंडोल, पाचोरा, भडगाव, पारोळा तहसीलदारांचा समावेश
जळगाव - जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी प्राप्त अनुदानाचे वितरण करण्यात दिरंगाई केल्याने चार तहसीलदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये एरंडोल, पाचोरा, भडगाव आणि पारोळा तहसीलदारांचा समावेश आहे. या चारही तहसीलदारांकडून खुलासा मागविण्यात आला असून खुलासा समाधानकारक नसल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. दरम्यान, या अनुदानाचे धीम्या गतीने वाटप सुरू असल्याचे वृत्तही ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.
जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ६ लाख ४१ हजार ३४५ शेतकऱ्यांचे ७ लाख १८ हजार १२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले व या नुकसानीपोटी जिल्ह्यासाठी ३३ टक्क्यांंपेक्षा जास्त बाधीत जिरायत क्षेत्रासाठी ३१७ कोटी २३ लाख २५ हजार ४९४ रूपये, ३३ टक्क्यांंपेक्षा जास्त बाधीत बागायत क्षेत्रासाठी ३०७ कोटी ७१ लाख ४४ हजार ७७५ रूपये तर ३३ टक्क्यांंपेक्षा जास्त बाधीत फळपिकांसाठी १८ कोटी ६९ लाख ८२ हजार २० रुपये अशी एकूण ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार २८९ रूपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून २८ टक्के रक्कम म्हणजेच १७९ कोटी ९८ लाख १ हजार रूपये वितरीत करण्यात आला. या प्राप्त अनुदानाचे तहसीलदारांना तातडीने वितरण करण्यात येऊन ते शेतकºयांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी अनुदान वाटपाला सुरुवात केली.
या अनुदान वाटपाचा दैनंदिन अहवाल प्रशासनाने तहसीलदारांकडून मागविला होता. अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४४ हजार ८५२ शेतकºयांना १६६ कोटी १७ लाख ८५ हजार ३३५ रुपये अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. एकूण ९२.६२ टक्के अनुदान वाटप झाले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
चार तालुक्यात कमी वाटप
जिल्ह्यातील भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा या तालुक्यातील शेतकºयांना अनुदानाचे १०० टक्के वितरण करण्यात आले आहे. तर जळगाव तालुक्यात ९९.७० टक्के, जामनेर तालुक्यात ९९.९८ टक्के, धरणगाव तालुक्यात ९८.९२ टक्के, यावल तालुक्यात ९९.९९ टक्के अनुदानाचे वाटप झाले आहे. मात्र एरंडोल, पाचोरा, भडगाव आणि पारोळा या चार तालुक्यातील तहसीलदारांनी अनुदान वाटपात दिरंगाई केल्याचे दिसून आले आहे. यामध्ये एरंडोल तालुक्यात केवळ ६०.०८ टक्के अनुदानाचे वाटप झाले असून पाचोरा तालुक्यात ७४.९० टक्के, भडगाव तालुक्यात ७४.५४ टक्के, पारोळा तालुक्यात ८१.१९ टक्के अनुदानाचे वाटप झाले आहे. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या आदेशान्वये चारही तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्याकडून खुलासादेखील मागविण्यात आला आहे.
अनुदान वाटपाची टक्केवारी या प्रमाणे (टक्क्यांमध्ये)
- जळगाव - ९९.७०
- जामनेर - ९९.९८,
- एरंडोल - ६०.०८
- धरणगाव - ९८.९२
- भुसावळ - १००,
- बोदवड - १००
- मुक्ताईनगर - १००
- यावल - ९९.९९
- रावेर - १००
- पाचोरा - ७४.९०
- भडगाव - ७४.५४
- पारोळा - ८१.१९
- चाळीसगाव - १००
- अमळनेर - १००
- चोपडा - १००