"फी" न भरल्यामुळे निकाल रोखणाऱ्या शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:17 AM2021-05-08T04:17:04+5:302021-05-08T04:17:04+5:30
लोकमत न्युज नेटवर्क जळगाव : फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याचा निकाल रोखणाऱ्या ब.गो.शानभाग माध्यमिक विद्यालय शाळेला जळगाव पंचायत ...
लोकमत न्युज नेटवर्क
जळगाव : फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याचा निकाल रोखणाऱ्या ब.गो.शानभाग माध्यमिक विद्यालय शाळेला जळगाव पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सतीश चौधरी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसांच्या आत खुलासा सादर न केल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असाही इशारा नोटिसेतून देण्यात आला आहे.
पालकाच्या तक्रारीत म्हटले की, शहरातील ब.गो.शानभाग माध्यमिक विद्यालयात प्रसाद शिंदे हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्याचा इयत्ता आठवीचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. पण, फी भरली नाही म्हणुन या विद्यार्थ्यांचा निकाल शाळेकडून रोखून ठेवण्यात आला. हा प्रकार पालक रवींद्र शिंदे यांना कळताच त्यांनी शाळेला संपर्क केला व त्याचा जाब विचारला. त्यावर व्यवस्थापन मंडळाचा निर्णय असून फी न भरल्यामुळे आपणास निकाल देऊ शकत नाही, असे शाळेकडून सांगण्यात आले. अखेर पालक रवींद्र शिंदे यांनी शुक्रवारी पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे निकाल राखीव ठेवल्याबाबत तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेऊन गटशिक्षण अधिकारी यांनी शानभाग शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
- कोट ज्या दिवशी निकाल जाहीर झाला. त्याच दिवशी त्या विद्यार्थ्याला निकाल मिळाला आहे. जून-२०२० ते मे -२०२१ पर्यंत ऑनलाईन शिक्षण देण्यात आलेला आहे. पण, त्या विद्यार्थ्यांच्या पालकाने फी भरलेली नाही. तरी देखील विद्यार्थ्यास अध्यापन करण्यात आले व विविध परीक्षांचा निकाल देण्यात आला. फी भरली नाही म्हणून शाळेकडून कुठल्याही प्रकारे अडवणुक करण्यात आलेली नाही. आपण दोन दिवसात खुलासा सादर करणार आहोत. सगळे आरोप निराधार आहेत.
- जयंत टेंभरे, उपमुख्याध्यापक, शानभाग विद्यालय