सारवे ग्रामसेवकाला आरोग्य केंद्राची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:12 AM2021-07-12T04:12:05+5:302021-07-12T04:12:05+5:30
पारोळा : सारवे बुद्रुक, ता. पारोळा येथे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावात साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. यामुळे ...
पारोळा : सारवे बुद्रुक, ता. पारोळा येथे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावात साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. यामुळे शेळावे प्राथमिक आरोग्य केंद्राने सारवे ग्रामसेवकाला नोटीस बजावली आहे.
सारवे गावातील अस्वच्छतेबाबत ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील व नंदू पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे लेखी तक्रार केली होती. त्यास अनुसरून वैद्यकीय अधिकारी व पथकाने गावाला भेट दिली असता, त्यांना या तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यावर ग्रामसेवकाला नोटीस बजावण्यात आली आहे.
यात म्हटले आहे की, गावातील नळाखालील खोल खड्डे बुजवून घ्यावेत व नळांना तोट्या बसवाव्यात. सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर ट्युबवेल व हातपंपाच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात यावा. संजय नरसिंग पाटील यांच्या घरासमोरील हातपंपास कठडा नाही. हातपंपाच्या बाजूने सांडपाणी वाहते, त्यामुळे पाणी दूषित होऊ शकते. गावातील नळकनेक्शन गळती, व्हॉल्व्ह गळती त्वरित काढून घ्यावी. नळकनेक्शन जमिनीपासून उंचावर असावेत. गावातील उकिरडे त्वरित उचलून गावाबाहेर टाकावेत.
प्रत्येक शनिवार कोरडा दिवस म्हणून पाळण्यासंबंधी गावात दवंडी देण्यात यावी. या उपाययोजना त्वरित करून घ्याव्यात व कोठेही साथ उद्रेक होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी, असेही यात नमूद करण्यात आले आहे.