मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी जळगाव नागरी पतपेढीला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:22 AM2021-06-16T04:22:02+5:302021-06-16T04:22:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ४५ लाख रुपयांच्या कर्ज प्रकरणी सभासदांनी मुद्रांक शुल्क न भरल्याने जळगाव नागरी सहकारी पतपेढीला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ४५ लाख रुपयांच्या कर्ज प्रकरणी सभासदांनी मुद्रांक शुल्क न भरल्याने जळगाव नागरी सहकारी पतपेढीला सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव यांनी नोटीस बजावली आहे. सात दिवसांच्या आत पतपेढीने मुद्रांक शुल्क वसूल करून शासन जमा करावे, अन्यथा पुढील कार्यवाही करण्यात येईल, असा इशारादेखील दिला आहे.
याप्रकरणी पतपेढीचे सभासद विकास उखर्डू नारखेडे यांनी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दिलीप चिंतामण चौधरी हे पतपेढीचे सभासद असून, त्यांनी स्वत:सह आई, पत्नी यांच्या नावाने एकूण ४५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जापोटी त्यांनी मुद्रांक शुल्क भरले नाही. या विषयीच्या नारखेडे यांच्या तक्रारीनंतर सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाने चौधरी यांना पत्र दिले होते व त्यावर ७ जून रोजी चौधरी यांनी आपले म्हणणे सादर केले होते. त्यात त्यांनी विनातारण कर्ज घेतल्याचे नमूद करीत सदर पतपेढीकडे कोणतीही प्रॉपर्टी तारण दिली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ७ जून रोजीची नोटीस रद्द करावी, अशी विनंती केली लेखी खुलाशाद्वारे केली होती.
याप्रकरणी अखेर सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी भालेराव यांनी जळगाव नागरी सहकारी पतपेढीला नोटीस बजावून आठ हजार ७०० रुपये मुद्रांक शुल्क व त्यावरील दंड सात दिवसांच्या आत वसूल करून शासन जमा करावा, अन्यथा पुढील कार्यवाही करावी, असा इशारा दिला आहे.