वेदांत, टायटन, संवेदना, दत्त हॉस्पिटलला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:15 AM2021-04-16T04:15:12+5:302021-04-16T04:15:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गरज नसतानाही रेेमडेसिविरचा सर्रास वापर, ऑक्सिजनचा आवश्यकतेपेक्षा अधिक वापर अशा विविध कारणास्तव शहरातील टायटन, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गरज नसतानाही रेेमडेसिविरचा सर्रास वापर, ऑक्सिजनचा आवश्यकतेपेक्षा अधिक वापर अशा विविध कारणास्तव शहरातील टायटन, वेदांत, संवेदना व दत्त हॉस्पिटल यांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी नोटीस बजावली असून दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे. यात दोन हॉस्पिटलमध्ये अधिक मृत्यू झाले असून याबाबत आपल्यावर गुन्हा का दाखल करू नये याबाबत या रुग्णालयांकडून खुलासा मागविण्यात आला आहे.
खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते, मात्र, काही रुग्णालये परवानगी न घेता किंवा निकष न पाळता रुग्णांवर उपचार करीत आहेत. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी निकष न पाळणाऱ्या या रुग्णालयांना नोटीस दिल्या आहेत. यात संवेदना हॉस्पिटलचे डॉ. सुदर्शन पाटील, वेदांत हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप कुकरेजा, टायटन हॉस्पिटलचे व्यवस्थापक, दत्त हॉस्पिटलचे डॉ. उमेश साळुंके यांना ही नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला आहे.
१) वेदांत हॉस्पिटल
- मान्यता निलंबित असताना पाच कोविड रुग्णांवर उपचार
दरपत्रक दर्शनी भागात नव्हते, डोनिंग डोफिंगची व्यवस्था नाही
ज्यांच्या नावावर रुग्णालय आहे ते डॉक्टर उपस्थित नव्हते, युनानी डॉक्टर काम करीत असताना दिसून आले.
आपल्या रुग्णालयात मृत्यू हे डॉक्टर उपस्थित नसल्याने झालेले आहेत. असे समजते तर आपल्याला यास जबाबदार धरून आपल्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, रेमडेसिविरची गरज नसताना त्याचा वापर झाल्याचे आढळले, आवश्यकतेपेक्षा जास्त ऑक्सिजनचा वापर झालेला दिसून आला.
२) संवेदना हॉस्पिटल
६० बेडची परवानगी असताना ७० रुग्ण दाखल
रेमडेसिविरची गरज नसतानाही रेमडेसिविर देण्यात आल्याचे दिसून आले.
ऑक्सिजनचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर
नॉन ओटू रुग्ण दाखल असल्याचे आढळून आले, ज्या रुग्णांना आवश्यकता त्यांना बेड मिळत नाही,
३) दत्त हॉस्पिटल
३५ बेडची परवानगी असताना जास्त रुग्ण दाखल
ज्या डॉक्टरांच्या नावावर रुग्णालय ते नसून युनानी डॉक्टर काम करताना आढळून आले.
गरज नसताना रेमडेसिविरचा रुग्णांवर वापर
ऑक्सिजनचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर
४) टायटन हॉस्पिटल
कोविडची मान्यता नसताना कोविड पॉझिटिव्ह पेशंट दाखल होते.
हॉस्पिटलात फिजिशियन किंवा इंटन्सिव्हिस् नसताना आयसीयूमध्ये सारी व कोविडसदृश रुग्ण दाखल होते.
आयसीयूमध्ये युनानी डॉक्टर काम करीत होते. जे डॉक्टर आपल्याशी संलग्नित आहे सांगण्यात आले मात्र, त्यांच एओयू झालेला नाही. किंवा त्यांची कुठेही नोंद नाही.
रेमडेसिविरचा सर्रास वापर सुरू आहे.
ऑक्सिजनचा आवश्यकतेपेक्षा अधिक वापर
रुग्णालयात अनेक रुग्णांचा मृृत्यू झाला आहे. त्याची जबाबदारी आपल्यावर का देण्यात येऊ नये, किंवा गुन्हा दाखल करून रुग्णालयाची नोंदणी रद्द का करण्यात येऊ नये?