निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हॉटस्अॅप अॅडमिनला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:11 PM2019-10-07T12:11:51+5:302019-10-07T12:12:45+5:30
पोलिस : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा इशारा
जळगाव : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने व्हॉटस्अॅप ग्रुप किंवा सोशल मिडियाच्या माध्यमातून राजकीय पक्षांवर किंवा वैयक्तिक टिका टिपण्णी करू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाई केली जाईल,अशी नोटीस पारोळा पोलीस निरीक्षकांनी व्हॉटस्अॅप ग्रुपच्या अॅडमिनना बजावल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असता अशी नोटीस देता येते का? ते तपासावे लागेल, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पारोळा पोलिस निरीक्षकांनी रविवारी व्हॉटस्अॅप ग्रुपच्या अॅडमिनना काढलेली नोटीस सोशल मिडियावरच चांगलीच व्हायरल झाली. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होत असल्याचा आरोपही होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, काही चुकीचा मेसेज सोशल मिडियावर टाकला व त्यावरून वाद निर्माण झाल्यास संबंधीत व्यक्तीवर कारवाई केली जाते. मात्र अशी व्हॉटस्अॅप गृप अॅडमिनला नोटीस देता येते का? हे तपासावे लागेल.
अशी नोटीस देता येते का? कोणत्या अधिकारात दिली? हे बघावे लागेल. चुकीचे मेसेज पाठविले व त्यामुळे वाद निर्माण झाल्यास संबंधीतावर कारवाई केली जाते. मात्र अशी नोटीस द्यायची ठरविली तरी किती जणांना देणार? -डॉ.अविनाश ढाकणे,
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही नोटीस काढण्यात आली आहे. प्रत्येकाला वैयक्तिक ही नोटीस देणे शक्य नाही, म्हणून शक्य तितक्या व्हॉयस्अॅप गृपवरच ती पाठविण्यात आली आहे. संभाव्य घटना टाळण्यासाठी खबरदारी म्हणून अशी नोटीस काढण्याचा पोलिसांना अधिकार आहे.
-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक