फैजपूर पालिकेकडून अतिक्रमणधारकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 05:38 PM2018-10-14T17:38:21+5:302018-10-14T17:39:37+5:30
फैजपूर पालिकेने शहरातील छत्री चौकात व्यवसाय करणाऱ्या १२ व्यावसायिकांना तसेच धाडी नदीपात्रात वास्तव्य करणाºया ३० रहिवाशांना अशा एकूण ४२ अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याची नोटीस दिल्याने एकच खळबळ उडाली.
फैजपूर, जि.जळगाव : पालिकेने शहरातील छत्री चौकात व्यवसाय करणाऱ्या १२ व्यावसायिकांना तसेच धाडी नदीपात्रात वास्तव्य करणाºया ३० रहिवाशांना अशा एकूण ४२ अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याची नोटीस दिल्याने एकच खळबळ उडाली.
पालिकेकडून छत्री चौकात ७० लाख रुपये खर्चून ऐतिहासिक १९३६च्या ग्रामीण काँग्रेस अधिवेशनाचे संकल्प चित्र उभारण्यात आले आहे, पण या संकल्प चित्रासमोरच मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण रहदारीलासुद्धा अडसर ठरत आहे. त्यामुळे हा रस्ता मोकळा करून द्यावा, असे १२ व्यावसायिकांंना पालिकेने नोटिसा बजावत सात दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्याचे सूचना केल्या आहेत.
त्याचप्रमाणे धाडी नदीपात्रातसुद्धा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून अनेक जण वास्तव्य करत आहे. याच ठिकाणी पालिकेने श्रीराम टॉकीज ते लक्कड पेठपर्यंत रस्त्याचे काम सुरू केले आहे. या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कामाला अडचणी येत आहेत. हा रस्ता झाल्यास शहरातील रहदारीचा ताण कमी होऊन भेट खिरोदा रस्त्यापर्यंत अथवा लक्कड पेठमध्ये जाणाºया नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे. त्यामुळे नदीपात्रात वास्तव्य करणाºया अशा ३० रहिवाशांनासुद्धा पालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहे. त्यांना १५ दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्याचे नोटिशीत नमूद केले आहे.
दरम्यान, व्यावसायिक व अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे अन्यथा पालिकेकडून अतिक्रमण काढून संबंधितांवर ती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी तंबी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी नोटिशीद्वारे दिली आहे.