आता २ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 01:06 PM2019-07-08T13:06:27+5:302019-07-08T13:07:13+5:30

मुख्यमंत्री फडणवीस : ‘अनुलोम’च्या उत्कृष्ट जनसेवकांचा सत्कार

 Now aims to remove 2 million cubic meters of mud ... | आता २ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट...

आता २ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट...

googlenewsNext


जळगाव : गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार अभियानात ‘अनुलोम’ संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. या संस्थेने पुढील वर्षी २ कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जैन हिल्स येथील कस्तुरबा गांधी सभागृहात रविवारी सकाळी अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात ‘अनुलोम’चा चौथा वार्षिक अनुलोम संगम सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, ‘अनुलोम’चे कार्यकारी अधिकारी अतुल वझे, पंकज पाठक व ‘अनुलोम’चे जनसेवक, भागसेवक, विस्तारक उपस्थित होते. उत्कृष्ट कार्य करणारे जनसेवक, भाग सेवक, विस्तारक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. नितीन खर्चे लिखित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू’ या पुस्तकाचा प्रा.डॉ. सुनील कुलकर्णी यांनी हिंदी भाषेत अनुवादित केलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय, जीवनदर्शन के विविध पैलू’ या पुस्तकाचे व अनुलोमच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
कॅलिफोर्नियापेक्षा कोकण समृध्द
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोकणातील पर्यटन वाढावे म्हणून गेल्या पाच वर्षात विविध पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या. रायगड जिल्हा औद्योगिक विकासाच्या अग्रभागी आणण्यात आला. ‘नैना’च्या माध्यमातून तिसरी मुंबई आकारास येत आहे. पालघर व ठाणे या भागात आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे या भागाचा आरोग्य निर्देशांक उंचावला असून कुपोषण मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. कोकणचा कॅलिफोर्निया केव्हा होणार? असा प्रश्न एका जनसेवकाने केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, कॅलिफोर्नियापेक्षा कोकण समृध्द आहे.
शेती व्यवसाय, सेवा, उद्योग क्षेत्राच्या विस्तारास संधी
तसेच येत्या काळात १०० लाख कोटी रुपये खर्चून पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यासाठी पुढील पाच वर्षे महत्वाची असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात ३ लाख ७४ हजार घनमीटर गाळ काढला
अनुलोम संस्थेने शासनाच्या सहकार्याने गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ६५ कामे केली. त्यापैकी ५७ कामे जेसीबी तर ७ कामे पोकलेनच्या सहाय्याने करण्यात आली. यापैकी ४७ कामे पूर्ण झाली असून १८ कामे सुरू आहेत. याद्वारे आतापर्यंत ३ लाख ७४ हजार २६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. या गाळाच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टरच्या १ लाख ३३ हजार ५२६ तर हायवाच्या ३०१ फेऱ्या झाल्या. त्यासाठी ५३ हजार ४१८ लिटर डिझेल लागले. तर जेसीबी व पोकलेनसाठी ३५ लाख ७१ हजार १६५ रूपये भाडे लागले आहे. एकूण १ हजार ३३५ एकरवर ही गाळाची माती टाकण्यात आली. त्याचा ६८० शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.
 

Web Title:  Now aims to remove 2 million cubic meters of mud ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.