आता रात्री विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच ॲन्टिजेन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:15 AM2021-04-14T04:15:11+5:302021-04-14T04:15:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव थांबता थांबत नाहीये. हा संसर्ग रोखण्यासाठी व कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव थांबता थांबत नाहीये. हा संसर्ग रोखण्यासाठी व कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी रात्री ८ वाजेनंतर रस्त्यावर फिरणाऱ्यांची पोलिसांकडून आता रस्त्यावर ॲन्टिजेन चाचणी करण्यात येत होती. मंगळवारी रात्री जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी यात सहभाग घेतला.
जिल्ह्यात कोरोना विषाणूने पुन्हा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. दररोज हजाराच्यावर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. मृत्यूचे प्रमाणसुध्दा वाढले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी व कुणा बाधिताकडून इतर कुणाला कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आता पोलीस व आरोग्य विभागाकडून रात्री लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच ॲन्टिजेन चाचणीस सुरुवात करण्यात आली. त्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या व्यक्तीला लागलीच कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.
एसपी उतरले रस्त्यावर....
मंगळवारी रात्रीपासूनच आकाशवाणी चौकात हा उपक्रम सुरू झाला. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी रात्री रस्त्यावर उतरून आकाशवाणी चौकात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची ॲन्टिजेन तपासणी केली. तसेच एमआयडीसी पोलिसांनीदेखील रात्री विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी केली.