आता बाजार समिती शुल्क हद्दपारसाठी लढा - प्रवीण पगारिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:05 PM2019-05-26T12:05:53+5:302019-05-26T12:06:19+5:30
गाळे प्रश्न सोडविण्यासाठीही करणार पाठपुरावा
जळगाव : अनेक कर कालबाह्य झाले असले तरी ते व्यापाऱ्यांच्या मानगुटीवर कायम असल्याने त्यामुळे व्यापारी वर्ग त्रस्त आहे. त्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजार शुल्क हद्दपार करण्यासाठी सर्वप्रथम लढा राहणार आहे, असा मनोदय कॉन्फडरेशन आॅल इंडिया ट्रेडर्सचे (कैट) राज्य सचिव प्रवीण पगारिया यांनी व्यक्त केला.
व्यापारी बांधवांच्या कॉन्फडरेशन आॅल इंडिया ट्रेडर्स (कैट) या देशपातळीवरील संघटनेच्या राज्य सचिवपदी प्रवीण पगारिया यांची नुकतीच निवड झाली. देशपातळीवरील हे पद जळगावला मिळाल्याने त्या माध्यमातून व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागणार असल्याचा विश्वास व्यापारी बांधवांना आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने पगारिया यांच्याशी बातचीत केली. त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद....
प्रश्न - राष्ट्रीय पातळीवरील हे पद मिळाल्यानंतर आपले प्रथम प्राधान्य कशाला असेल?
उत्तर - कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजार शुल्क ज्या उद्देशाने आकारले जात होते, तो उद्देश आता राहिलेला नाही. सोबतच विधानसभा निवडणुकीपूर्वी कृउबा कर्मचाºयांना सरकारमध्ये सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही सरकारकडून मिळाली आहे. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवून बाजार समिती शुल्कातून व्यापाºयांना मुक्तता मिळण्यासाठी प्राधान्य राहणार आहे.
प्रश्न - व्यापाºयांचे प्रश्न सुटण्यासाठी सरकारकडून कोणती अपेक्षा आहे ?
उत्तर - व्यापाºयांविषयी कोणतेही निर्णय घेताना त्यांना विश्वासात घेतले जात नाही. त्यासाठी उद्योग मंत्रालयाप्रमाणे स्वतंत्र्य व्यापारी मंत्रालयदेखील असावे व विधानपरिषद तसेच राज्यसभेवर एक-एक व्यापारी प्रतिनिधीची निवड केली जावी.
प्रश्न - व्यापारी दृष्टीने शहरातील कोणता प्रश्न मार्गी लागल्यास अधिक भरभराट येऊ शकते ?
उत्तर - शहरातील गाळे प्रश्न हा महत्त्वाचा असून अनेक वर्षांपासून तो मार्गी लागत नसल्याने व्यापारी बांधवांवर ती एक प्रकारे टांगती तलवार आहे. यामुळे व्यापारी आपला व्यापार व्यवस्थित करू शकत नसल्याने त्यांच्यासमोर अनेक अडचणींचा डोंगर आहे. त्यासाठी हा प्रश्न मार्गी लागणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.
प्रश्न - व्यापारी धोरणाबाबत काय नियोजन आहे ?
उत्तर - देशपातळीवर महत्त्वाचे पद मिळाल्याने त्याचा शहरातील व्यापारी धोरणास जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी आपले प्रयत्न आहे. मी केवळ एक प्रतिनिधी आहे. कोणतीही भूमिका मांडताना तत्पूर्वी व्यापारी बांधवांच्या विविध संघटना, पदाधिकारी तसेच सर्वच व्यापाºयांशी चर्चा करून सर्वांच्यासल्ल्यानुसार व मार्गदर्शनानेव्यापारीपेठजळगावच्याभरभराटीसाठीआणखीप्रयत्नकेलेजातील.
शहरातील मिश्रीलाल चोपडा, शिवनारायण झवर, चंद्रकांत कोठारी, जयंतीभाई दोशी यांनी व्यापारक्षेत्रात देशभरात जळगावचे नाव झळकविले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व्यापारी महामंडळाची वाटचाल सुरू आहे. आताही महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, उपाध्यक्ष युसुफ मकरा, सचिव ललित बरडिया व सर्वच पदाधिकाºयांच्या सहकार्याने तसेच सर्वच संघटनांच्या एकजुटीने जळगावचे प्रश्न मांडले जातात. आताही सर्वांना सोबत घेऊन वाटचाल सुरू राहील.
- प्रवीण पगारिया, राज्य सचिव, ‘कैट’.