आता ‘धारावी’ पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:12 PM2020-07-27T12:12:11+5:302020-07-27T12:12:23+5:30
प्रत्येक मृत्यूचा अभ्यास करून सुधारणा करा : तपासणी वाढविण्याच्या तीन सदस्यीय केंद्रीय समितीच्या सूचना
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी धारावी पॅटर्नप्रमाणे स्टॅण्डर्ड आॅपरेशन प्रोसेस् (एसओपी) पद्धतीने काम करा, अशा सूचना केंद्रीय समितीने दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सहसचिव कुणालकुमार, नागपूर येथील एम्स रुग्णालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अरविंद कुशवाह, डॉ. सितिकांता बॅनर्जी यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय केंद्रीय समिती रविवारी जळगावात आली होती. जिल्ह्यातील मृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक मृत्यूची काय कारणे शोधा व त्याचा अभ्यास करा व त्यानुसार कामकाजाची आखणी करून सुधारणा करा, अशा सूचना समितीने दिल्या आहेत.
दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक घराची नोंद ठेवण्यासह सारी व इतर आजाराचे रुग्ण समोर येण्यासाठी तपासण्या वाढविण्याच्याही सूचना या समितीने केल्या आहेत. समितीने शहरातील प्रतिबंधित क्षेत्र, कोविड रुग्णालय इत्यादी ठिकाणची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
बेड असिस्टंट म्हणून नातेवाईकांना संधी
बाधित रुग्णांजवळील नातेवाईकांचा संचार थांबण्यासाठी बेड असिस्टंटची नियुक्ती करण्यात आली आहे. आता जे रुग्ण दाखल आहे, त्यांच्या नातेवाईकांपैकी कोणाला बेड असिस्टंट म्हणून काम करायची तयारी असल्यास त्यांची नियुक्ती केली जाईल, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र यासाठी संपूर्ण सुरक्षिता बाळगणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी नमूद केले.
लक्षणे दिसताच तपासणी गरजेची
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसताच स्वत: कोविड रुग्णालयामध्ये जावून कोरोनाची चाचणी करून घेत तात्काळ इलाज करून घेतल्यास मृत्यूदर नक्कीच कमी होवू शकेल, असा विश्वास कुणालकुमार यांनी बैठकी दरम्यान व्यक्त केला. आरोग्य प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर द्यावा व धारावी येथे कोरोना रुग्ण व मृत्यू रोखण्यासाठी अवलंबविण्यात आलेली व्यवस्थापन पद्धत येथेही राबवा, अशा सूचना कुणालकुमार यांनी दिल्या.
समितीने दिलेल्या सूचना
-तपासणी मोठ्या प्रमाणात वाढवा
-कोरोनाबाबत नागरिकांच्या मनातील भीती दूर करा
-मास्क वापरणे, हात धुणे इत्यादीबाबत सामाजित जागृती करा
-कमी वेळात अहवाल यावा
-जनतेशी संवाद वाढवा
-प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक घराची नोंद ठेवा
-येणाऱ्या अडचणी तसेच रुग्णवाहिकाविषयी व्यवस्थापन करा.
जिल्हाधिकाऱ्यांनी समितीपुढे मांडलेले मुद्दे
-जिल्ह्यात तपासणीचे प्रमाण वाढविले आहे.
-आॅक्सिजन बेडसह यंत्रणा सज्ज
-उपाययोजना वाढविल्याने मृत्यूदराचा आलेख खाली
-प्रयोगशाळेचा (लॅबचा) केंद्र सरकारच्या योजनेत समावेश करावा
-कोरोना रुग्णालयात मोठे बदल केल्याने रुग्णालय सुसज्ज झाले.
-चार ते पाच जणांची एकत्रित तपासणी (पूल टेस्टिंग) करणार
-६६ डॉक्टर व १५० परिचारिकांची कमतरता