आता रुग्णांच्या संख्येनुसार मिळणार रुग्णालयांना ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:14 AM2021-04-19T04:14:31+5:302021-04-19T04:14:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गासोबतच रुग्णदेखील वाढत असल्याने कोणत्या रुग्णालयात किती रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गासोबतच रुग्णदेखील वाढत असल्याने कोणत्या रुग्णालयात किती रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हे पाहूनच रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचा विचार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. ऑक्सिजनच्या योग्य वापरासाठी रात्रीच्यावेळी रुग्णाला लावण्यात आलेल्या ऑक्सिजनची दर दोन तासांनी तपासणी करणे आवश्यक आहे, याविषयी रुग्णालयांना सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, यासोबतच ऑक्सिजनची मागणीदेखील वाढत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्ग पसरला. मात्र त्या तुलनेत यंदा रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण अधिक असून, त्यांना ऑक्सिजनची गरज अधिक भासत आहे. यामुळेच जिल्ह्यात दररोज साधारण ४० ते ५० टन ऑक्सिजन लागत असून, त्या तुलनेत त्याचा पुरवठा कमी होत आहे. यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनची आणीबाणीची परिस्थिती उद्भवते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठा याविषयी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ही माहिती दिली.
ऑक्सिजनच्या वापरासंदर्भात यापूर्वीदेखील रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. तरीदेखील जिल्ह्यात ऑक्सिजनची जेमतेम उपलब्धता होत आहे. यावर मात करण्यासाठी सरसकट कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन न लावता ज्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णाला तो लावला गेला पाहिजे, असे जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.
प्रत्येक रुग्णालयाकडे असलेल्या सिलिंडरच्या संख्येनुसार त्यांना ते रिफिलिंग करून दिले जाते. मात्र आता कोणत्या रुग्णालयात किती गंभीर रुग्ण दाखल आहे व किती रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, हे पाहूनच त्या रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे.
घरी सिलिंडर देणे खपवून घेणार नाही
बहुतांश वेळा घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनचे सिलिंडर दिले जाते. यामध्ये ऑक्सिजन जास्त प्रमाणात लागतो व तो वायादेखील जातो. त्यामुळे आता घरी कोणी सिलिंडर दिले तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारादेखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
वेळोवेळी तपासणी आवश्यक
रुग्णाला ऑक्सिजन लावल्यानंतर तो कधी बंद करावा व किती प्रमाणात सुरू ठेवावा, हे पाहणेदेखील आवश्यक आहे. त्यासाठी रात्रीच्या वेळी ऑक्सिजन लावून दिल्यानंतर त्याकडे पाहिले न गेल्यास ऑक्सिजनचा विनाकारण वापर सुरू राहू शकतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी दर दोन-दोन तासांनी ऑक्सिजनची पाहणी करावी, अशा सूचना रुग्णालयांना दिल्या असल्याचेही जिल्हाधिकार्यांनी सांगितले.