मुंबई, पुणे, नाशिक साठी एसटीचे आता ऑनलाईन आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:35+5:302021-06-16T04:21:35+5:30
जळगाव : लॉकडाऊन मधील शिथिलता उठल्यानंतर प्रवाशांचा दिवसेंदिवस बस सेवेला प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी जळगाव आगारातर्फे रेल्वे ...
जळगाव : लॉकडाऊन मधील शिथिलता उठल्यानंतर प्रवाशांचा दिवसेंदिवस बस सेवेला प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी जळगाव आगारातर्फे रेल्वे प्रमाणे एसटी बसमध्येही ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे लालपरीच्या प्रवाशांना आता घरी बसून एसटीचे ऑनलाईन तिकीट काढता येणार आहे.
कोरोनामुळे १ मे पासून कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच काही तालुक्यांना बसेस सोडण्यात येत होत्या. कोरोनामुळे महामंडळाची ९० टक्के सेवा बंद असल्यामुळे एकट्या जळगाव विभागाचे १८ कोटींच्या घरात आर्थिक नुकसान झाले. मात्र, शासनाने ७ जूनपासून लॉकडाऊन मधील शिथिलता पूर्णत: शिथिल केल्यानंतर जळगाव आगारातर्फे पुन्हा पूर्वीप्रमाणे बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबई, पुणे व नाशिक मार्गावरही बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महामंडळाने या मार्गावरील बसेसला ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यामुळे खाजगी ट्रॅव्हल्सप्रमाणे एसटीचेही ऑनलाईन आरक्षण करून प्रवास करता येणार आहे.
इन्फो :
ट्रॅव्हल्सप्रमाणे झोपण्याची व्यवस्था
जळगाव आगारात गेल्या वर्षी दाखल झालेल्या विना वातानुकूलीत बसेसमध्ये झोपण्याची आणि बसण्याचीही आसने आहेत. त्यामुळे या बसेसमध्ये प्रवाशांना झोपदेखील घेता येणार आहे. तसेच पूर्वीप्रमाणेच या बसेसचाही तिकीट दर आहे. त्यामुळे या बसेसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणार असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
खाजगी ट्रॅॅव्हल्सप्रमाणे एसटी बसलाही आरक्षणाची सुविधा महामंडळाच्या जळगाव विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. लांब पल्ल्याच्या बसेसला आरक्षणाची सुविधा असून, प्रवाशांना एक महिना आधीदेखील तिकीट आरक्षण करता येणार आहे.
भगवान जगनोर, विभाग नियंत्रक