आता पोलीस ठाणेनिहाय गुन्ह्यांचा आढावा घेणार - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 05:37 PM2018-10-08T17:37:46+5:302018-10-08T17:40:18+5:30
जनतेच्या मनात विश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन
जळगाव : पोलीस दलाने गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करताना संवेदनशीलतेने काम करीत जनतेच्या मनात पोलीस दलाविषयी विश्वास वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच जिल्ह्यात पोलिसांना जास्तीत जास्त घरे उपलब्ध होण्यासाठी पीपीपी तत्वावर घरे बांधण्याचा प्रस्ताव तयार करावा, तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे सांगत यापुढे पोलीस ठाण्यानिहाय गुन्ह्याबाबत आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सूचित केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त राजाराम माने, खासदार ए.टी.पाटील, आमदार चंदूलाल पटेल, संजय सावकारे, शिरीष चौधरी, स्मिता वाघ, सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, उन्मेश पाटील, जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, पोलीस विशेष महानिरीक्षक चेरिंग दोरजे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यासाठी गुन्ह्यातील साक्षीपुरावे न्यायालयात भक्कमपणे सादर करावेत. सरकारी वकीलांसोबत चर्चा करून पोलीस आधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा. अवैध धंद्याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू, गुटखा विक्री किंवा सट्टा सुरू राहणार नाही याबाबत प्रभारी अधिकाºयांनी दक्षता घ्यावी.
अधिकाºयांनी आपल्या कामगिरीने जनतेच्या मनात पोलीस दलाविषयी विश्वास वाढेल असा प्रयत्न करावा. जिल्ह्यातील पोलीस निवासस्थानाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करावा, जिल्ह्यात पोलिसांना जास्तीत जास्त घरे उपलब्ध होण्यासाठी पीपीपी तत्वावर घरे बांधण्याचा प्रस्ताव तयार करावा, तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, यापुढे पोलीस ठाण्यानिहाय गुन्ह्याबाबत आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील पोलीस स्टेशननिहाय हत्या, महिला व बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्याबाबत तसेच आॅनलाईन आलेल्या तक्रारींचाही आढावा घेतला.
बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस दलातर्फे करण्यात येणाºया उपाययोजना व उपक्रमांचे सादरीकरण केले. या बैठकीस जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी उपस्थित होते.