आता एनईपीच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी, विद्यापीठात शुक्रवारी बैठक
By अमित महाबळ | Published: November 21, 2023 06:06 PM2023-11-21T18:06:36+5:302023-11-21T18:07:47+5:30
विद्यापीठ प्रशाळा, स्वायत्त महाविद्यालयात लागू
अमित महाबळ, जळगाव: पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाणार असून, या अंतर्गत चार वर्षीय अभ्यासक्रमाची माहिती सर्व घटकांना व्हावी यासाठी विद्यापीठात शुक्रवार, दि. १ डिसेंबर २०२३ रोजी अधिसभा सदस्य, प्राचार्य, संस्थाचालक यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाविद्यालयांमध्ये हे धोरण सन २०२४-२५ पासून लागू केले जाणार आहे. याबाबत विद्यापीठाने आजपर्यंत केलेली कार्यवाही, चार वर्षीय अभ्यासक्रमाची सर्वसाधारण माहिती सर्व घटकांना व्हावी म्हणून १ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सर्व अधिसभा सदस्य, प्राचार्य, संचालक, संस्थाचालक (अध्यक्ष / सचिव) यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी हे संवाद साधणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी दिली.
विद्यापीठ प्रशाळा, स्वायत्त महाविद्यालयात लागू
शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यापीठ प्रशाळा व स्वायत्त महाविद्यालयांमध्ये लागू करण्यात आले आहे. यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांचाही समावेश आहे. नवीन सत्रापासून सर्वच महाविद्यालयांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे. त्याची तयारी आता सुरू झाली आहे.