आता बंडखोर नगरसेवक भाजप नगरसेवकांना अपात्रतेसाठी दाखल करणार याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:41+5:302021-07-14T04:18:41+5:30
‘व्हीप’ चे राजकारण पेटणार : बंडखोर भाजपच्या नोटिसीला उद्या देणार उत्तर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेतील भाजपचे ...
‘व्हीप’ चे राजकारण पेटणार : बंडखोर भाजपच्या नोटिसीला उद्या देणार उत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेतील भाजपचे बंडखोर व निष्ठावान नगरसेवकांमध्ये आता ‘आर-पार’ की लढाई सुरू झाली आहे. बंडखोर नगरसेवकांनी प्रभाग समित्या भाजपच्या हातातून हिसकावल्यानंतर आता ज्या भाजप सदस्यांनी बंडखोर नगरसेवकांच्या गटनेत्यांनी बजावलेल्या व्हीपचे पालन केले नाही. अशा नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे गटनेते ॲड. दिलीप पोकळे यांनी दिली आहे.
प्रभाग समिती सभापतिपदासाठी भाजप व भाजप बंडखोरांच्या गटाकडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. या निवडणुकीआधीच भाजप बंडखोरांनी भाजप गटनेतेपदी ॲड. दिलीप पोकळे यांची निवड झाल्याचे जाहीर केले होते. तसेच हे पद भाजपचेच अधिकृत असल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच प्रभाग समिती सभापती निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांनी बंडखोर नगरसेवकांनी दिलेल्या उमेदवाराला मतदान करण्याबाबत व्हीप बजावला होता. मात्र, प्रत्यक्षात निवडणुकीत भाजप नगसेवकांनी हा व्हीप धुडकावून लावला. त्यामुळे बंडखोरांनी आता भाजपच्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.
प्रभाग समिती १ मध्ये भाजपने खेळला ‘सेफ गेम’ ?
चारही प्रभाग समित्यांमध्ये भाजपला बहुमत नसतानाही प्रभाग समिती २, ३ व ४ मध्ये भाजपने उमेदवार देऊन ही निवडणूक लढविली. मात्र, प्रभाग समिती १ मध्ये डॉ. चंद्रशेखर पाटील हे निवडणूक लढण्यास इच्छुक असतानादेखील बंडखोरांकडून अपात्रतेच्या प्रस्तावाची ‘झंझट’ मागे लागेल म्हणून भाजपच्या वरिष्ठांनी या प्रभागात उमेदवार देण्यास नकार दिल्याची माहिती भाजपच्याच सूत्रांनी दिली आहे. यामुळे काही नगरसेवक नाराज असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतची माहिती घेण्यासाठी भाजपचे महानगरप्रमुख दीपक सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.