आता शापोआ चौकशी समितीत सतीश चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:13 AM2021-06-10T04:13:05+5:302021-06-10T04:13:05+5:30
जळगाव : शानभाग विद्यालयातील शालेय पोषण आहार गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीतून पाचोरा गटशिक्षणाधिकारी ...
जळगाव : शानभाग विद्यालयातील शालेय पोषण आहार गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीतून पाचोरा गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांचे नाव वगळून त्यांच्या जागी आता जळगाव गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
शालेय पोषण आहार योजना सुरू झाल्यापासून शानभाग विद्यालयाने या योजनेचा लाभ घेतला आहे. पुरवठादाराकडून पुरविण्यात आलेले धान्य, आदी मालसुद्धा स्वीकारला आहे. पण, गेल्या दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिजवून अन्न दिलेले नाही. या आहारापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवले आहे. एवढेच नव्हे, तर शालेय पोषण आहाराचे रेकॉर्डसुद्धा बनावट असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ता रवींद्र शिंदे यांनी पुणे येथील शिक्षण संचालकांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन शालेय पोषण आहार उपसंचालक यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षणाधिकारी यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली होती. त्यामध्ये गटशिक्षणाधिकारी विकास एम. पाटील (पंचायत समिती, पाचोरा), शापोआ लेखा अधिकारी शामकांत एच. नाहळदे (प्राथमिक शिक्षण विभाग) तसेच शापोआ अधीक्षक अजित तडवी (पंचायत समिती, रावेर) यांची निवड केली होती. मात्र, अतिरिक्त कामाचा बोझा व संबंधित शाळेत पाल्य शिक्षण घेत असल्यामुळे नाव वगळण्यात यावे, अशी मागणी पाचोरा गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केली होती. त्यानुसार बुधवारी समितीतून त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता जळगाव गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.