दिव्यांग व ज्येष्ठांसाठी आता स्वतंत्र कॅम्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:23 AM2021-06-16T04:23:57+5:302021-06-16T04:23:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात शारीरिक व्याधी किंवा वयोमानाने केंद्रांवर जाऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी आता त्यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात शारीरिक व्याधी किंवा वयोमानाने केंद्रांवर जाऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी आता त्यांच्या घराजवळ स्वतंत्र कॅम्प लावून लसीकरण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून केले जात असून येत्या गुरुवारी जिल्हा टास्क फोर्सची बैठक झाल्यानंतर याबाबतीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.
सद्य:स्थिती जिल्हाभरात ३३७ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. केंद्रांची संख्या लसींचा पुरवठा वाढल्यानंतर दुपटीने वाढविण्यात आली. यात कोविशिल्ड लसीचाच अधिक पुरवठा झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आलेल्या डोसेसपेक्षा अधिक लसीकरण झाले असून याबाबत जिल्ह्याची कामगिरी चांगली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी. जमादार यांनी सांगितले.
२१ जूननंतर बदलणार स्थिती
२१ जूननंतर लसीकरणाच्या नियोजनात बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून विविध ठिकाणी केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे समजते. यात वयोगटानुसार लसीकरण होणार असल्याने त्यादृष्टीने हे नियोजन केले जाईल, असेही समजते. जिल्ह्यात दिव्यांग व वयोवृद्धांची संख्या लक्षात घेता त्यांना केंद्रापर्यंत येण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणेने त्यांच्यापर्यंत जाऊन लसीकरण करून घेण्याचे आगामी काळात नियोजन होणार असून येत्या गुरुवारी याबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.