आरोग्याच्या पदोन्नतींसाठी आता स्वतंत्र कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:15 AM2021-05-01T04:15:28+5:302021-05-01T04:15:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पदोन्नतींचा विषय मार्गी लावण्यासाठी आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पदोन्नतींचा विषय मार्गी लावण्यासाठी आता एक स्वतंत्र कक्ष व समिती स्थापन करून लवकरच ही कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.
कोरोना काळात अत्यावश्यक सेवेचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने शिवाय गेल्या तीन वर्षांपासून पदोन्नत्या रखडल्याने हा विभागाच सध्या बिकट परिस्थितीत आहे. फ्रंट लाइनवर लढणाऱ्या आरोग्य सेवकांच्या पदोन्नती नसल्याने ते गेल्या तीन या विभागात वरिष्ठ, कनिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी, शिपाई, अशी अनेक पदे रिक्त असून ही पदे पदोन्नत्यांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. मात्र, वर्षानुवर्षे हीच पदे भरली जात नसल्याने आरोग्य सेवकांची आरोग्य सहायक व आरोग्य सहायकांची आरोग्य पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती रखडली आहे. २०१८ पासून ही प्रक्रियाच झालेली नाही. दरम्यान, अन्य सर्व विभागाच्या पदोन्नत्या झालेल्या असताना केवळ आरोग्य विभागाच्याच पदोन्नत्या रखडल्या असल्याने आता यासाठी आता स्वतंत्र कक्षच स्थापन करून त्यात समिती बसवून त्यांच्याकडे केवळ ही जबाबदारी सोपवून हे काम लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.
कर्मचारी गंभीर झाल्यानंतर शिकावू काळाची आठवण
आरोग्य विभागात रुजू झालेल्या काही कर्मचाऱ्यांचे पाच पाच वर्षांपासून शिकाऊ काळच मंजूर झाले नसल्याची माहिती आहे. यात एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली व या कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यानंतर अखेर आरोग्य विभागाने या शिकाऊ काळाची फाइल हाती घेतली. तेव्हा पाच वर्षांपासून तो मंजूरच नसल्याचे समोर आले आहे. नियमानुसार एका वर्षभरात हा शिकाऊ काळ मंजूर करायचा असतो.
अशी आहेत पदे रिक्त
वरिष्ठ सहायक २ पदे रिक्त
कनिष्ठ सहायक ४ पदे रिक्त
सहायक लेखाधिकारी १ पद रिक्त
कनिष्ठ व वरिष्ठ लेखाधिकारी ४ पदे रिक्त
कनिष्ठ प्रशासन अधिकारी ३ पदे रिक्त
सांख्यिकी पर्यवेक्षक १ पद रिक्त
विस्तार अधिकारी आरोग्य ३ पदे रिक्त
आरोग्य सहायकाची पदोन्नती भरली जाणारी २३ पदे रिक्त
आरोग्य सहायक महिला पदोन्नती भरली जाणारी ३७ पदे रिक्त
आरोग्य पर्यवेक्षक पदोन्नती भरली जाणारी १७ पदे रिक्त