आता दागिन्यातच दिसतोय चोरट्यांचा चेहरा! सराफ्यांकडे ‘हॉलमार्क’चा आरसा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 08:40 PM2023-04-30T20:40:59+5:302023-04-30T20:41:43+5:30
‘एचयूआयडी’ नंबराने रोखली बदमाशगिरी....
कुंदन पाटील
जळगाव : केंद्र शासनाने सोन्याच्या दागिने विक्रीत पारदर्शकतेसाठी ‘हॉलमार्क’ कायदा केला आहे.या कायद्याच्या फासात आता चोरटेही अडकायला लागले आहेत. भेसळयुक्त सोन्याची विक्री करणाऱ्या सराफ्यांसह चोरट्यांचेही हातपाय ‘हॉलमार्क’ने बांधले आहेत.
१ एप्रिलपासून सोन्याच्या दागिन्यांवर तीन चिन्ह असलेले ‘एचयूआयडी’ (हॉलमार्क युनीक आयडेंटीफिकेशन नंबर) नंबराची नोंदणी सक्तीची केली आहे. त्यासाठी शासनाच्या निगराणीखाली देशभरात ‘हॉलमार्क’ सेंटर कार्यान्वीत झाले आहेत. या प्रक्रियेतून सोन्याची शुद्धता, हॉलमार्क कुठल्या सेंटरवरुन केले आणि हा दागिना कुठल्या सराफ्याकडचा आहे, या गोष्टी सहजच स्पष्ट होत आहे. भविष्यात दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकाचे नावही ‘एचयूआयडी’मध्ये समाविष्ट करण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न आहे. या निर्णयाला मात्र सराफ्यांचा विरोध आहे. केंद्र शासन मात्र आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे.
चोरटा अडकतोय सुवर्ण धाग्यात
दागिना किती कॅरेटचा व कुठून घेतला, याविषयी माहिती विचारताच चोरट्यांचा खरा उघड करण्यासाठी ‘एचयूआयडी’नंबर फायदेशीर ठरतो आहे. ‘हॉलमार्क’च्या आरशात चेहरा स्पष्ट होताच काही सराफी पोलिसांकरवी चोरट्यांभोवती कारवाईचा फास आवळत आहेत.
...तर सराफ्यांच्या हातात दंडाची पावती
हॉलमार्कबरोबरच सोन्याच्या दागिन्यांवर एचयूआयडी क्रमांक अनिवार्य झाला आहे. या क्रमांकाविना सराफाने दागिने विक्री केल्यास संबंधिताला एक लाख रुपये वा दागिन्याच्या पाचपट किमतीचे दंड व कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे चोरट्यांकडून दागिने विकत घेणाऱ्या सराफी व्यावसायिकांचीही गोची झाली आहे.
देशातील हॉलमार्क सेंटर-१०१४
राज्यातील सेंटर-२२१
जळगावातील सेंटर-०४
‘हॉलमार्क’साठी नोंदणीकृत पेढ्या
जळगाव जिल्हा- ४७२
महाराष्ट्र-२६६६५
कॅरेटनुसार सोन्याचे प्रमाण
कॅरेट- शुद्धतेची टक्केवारी
१४- ५८.५
१८- ७५.०
२०- ८३.३
२२- ९१.६
२३- ९५.८
२४- ९९.५