आता रेल्वे येऊ लागलीय पूर्वपदावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:30+5:302021-06-27T04:12:30+5:30
भुसावळ : अनलॉकनंतर आता रेल्वे स्थानकावर ‘यात्री गण कृपया ध्यान दे’, यासह चाय वाला, बिस्किटवाला असे विविध ...
भुसावळ : अनलॉकनंतर आता रेल्वे स्थानकावर ‘यात्री गण कृपया ध्यान दे’, यासह चाय वाला, बिस्किटवाला असे विविध प्रकाराचे ध्वनी पूर्वीसारखे ऐकायला येत आहे. जूनच्या अवघ्या फक्त २४ दिवसात रेल्वे प्रवासात प्रवाशांची दुपटीने वाढ झाली असून तितकेच उत्पन्नदेखील वाढले आहे. अनलॉकनंतर आता रेल्वे पूर्वपदावर येताना दिसून येत आहे.
उत्पन्न ८ वरून २१ लाख
कोरोना दुसऱ्या लाटेत ‘मार्च ते मे’ या दरम्यान अक्षरशः थैमान घातले होते. अनेकांना आपले जीवसुद्धा गमवावे लागले. त्यानंतर सब कुछ ठीक हे असे समजत प्रशासनाने प्रवासासह इतर सर्वच बाबींमध्ये शिथिलता दिली, मात्र दुसऱ्या लाटेचे कहर दिसताच प्रशासनाने कडक निर्बंध लादले होते व आता जवळपास दुसरी लाट ओसरली आहे. जीवनमान पूर्वपदावर येत असून, याचा परिणाम रेल्वेवरही दिसून येत आहे. पूर्वी मे महिन्यात प्रति दिवस भुसावळ येथील रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवरून अवघ्या आठ ते दहा लाखाचे उत्पन्न रेल्वेला व्हायचे. मात्र आता जवळपास २१ लाखापर्यंत उत्पन्न रेल्वेला होत आहे.
४३७ प्रवासी दिवसाला
मे महिन्यात प्रति दिवस सरासरी ४३७ प्रवासी दिवसाला तिकीट बुकिंग करायचे. यातून प्रति दिवस रेल्वेला १० लाखांचे उत्पन्न मिळायचे. ती संख्या जूनच्या अवघ्या २५ दिवसात प्रतिदिवस ८५० प्रवासी तिकीट बुकिंग करीत आहेत. यातून दुपटीने अर्थातच २१ लाखांपर्यंतचे प्रति दिवस रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
७० रेल्वे गाड्या
याशिवाय पूर्वी निम्म्यावर झालेल्या गाड्यांची संख्या आता दुपटीने झाली आहे. कोरोना काळात काही गाड्या सोडल्यास आजही भुसावळ रेल्वे स्थानकावरून तब्बल ७० पेक्षा जास्त प्रवासी गाड्या अप-डाऊनध्ये धावत आहे.
चैतन्य हळूहळू पूर्वपदावर
कोरोना काळापूर्वी रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी नेहमी उद्घोषणा ऐकायला मिळायची. यात्री गण कृपया ध्यान दे, अमूक गाडी या स्थानकावरून या फलाटावरून सुटणार आहे. तसेच गाडी स्थानकावर थांबल्यानंतर चाय वाला, भजे वाला, पाणीवाला यांचीही पूर्वीच्या मानाने आता विक्री तेजीत होत असून, कुली बांधवाच्या हातालाही रोजगार मिळत आहे. एकूणच कोरेाना काळात मध्यंतरी झालेली स्थिती आता पूर्वपदावर येताना दिसून येत आहे.
मुंबई-पुणे, अहमदाबाद, सुरतकडे प्रवाशांचा कल
अनलॉकनंतर जे प्रवासी युपी, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार पश्चिम बंगाल, दिल्ली या राज्यांमध्ये गेले होते आता ते डाऊनच्या दिशेने अर्थातच मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबाद या शहरांकडे रोजगारासाठी परत येताना दिसत आहेत. जास्तीची बुकिंग व गर्दी डाऊन दिशेनेच दिसून येत आहे तर यु.पी., बिहार, दिल्ली, मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीच्या तुलनेत अत्यल्प झाली आहे.
ऑनलाइन व एजंटकडूनही बुकिंग तेजीत
स्मार्ट युगामध्ये घरबसल्या अगदी सगळे काम ऑनलाइन होत असताना प्रवासीही आता स्मार्ट झाले आहेत. पूर्वी जो कल प्रवाशांचा तिकीट काऊंटर बुकिंग खिडकीवरून मॅन्युअली तिकीट काढायचा होता. यात मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येत आहे. आता प्रवासी ऑनलाइन तिकीट बुकिंग करताना दिसून येत आहेत. याशिवाय अनेक व्यावसायिक हे बुकिंग एजंट करून तिकीट बुक करण्याला पसंती देत आहे.
फलाट तिकिटाची किंमत कमी झाल्याने सोडण्यासाठी गर्दी
मध्यंतरी कोरोना रुग्ण संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे प्रवाशांशिवाय इतरांनी फलाटावर येऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने फलाट तिकिटाची किंमत ५० रुपये केली होती. मात्र आता ती पूर्वीसारखेच १० रुपये केल्यामुळे नातेवाइकांना सोडण्यासाठी स्थानिक मंडळी फलाटाचे तिकीट काढून स्थानकापर्यंत सोडण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसून येत आहेत.
तत्काळ तिकीटही जोरात
तत्काळ तिकीट हे अवघ्या काही मिनिटातच उपलब्ध होते. यानंतर तिकिटाची स्थिती वेटिंगवर जाऊन पोहोचते. अगदी वेळेवर प्रवासाचे नियोजन झालेल्या प्रवाशांचा कल हे तत्काळ तिकिटावर अवलंबून असते. याकरिता आता व्यावसायिकांची व्यवसायानिमित्त तत्काळ तिकिटाच्या वेळेत गर्दी होताना दिसून येत आहे.
तत्काळ तिकीट काढण्याच्या वेळेवर गोंधळ होऊ नये याकरिता प्रवाशांना नियमानुसार टोकन दिल्यानंतर तिकीट खिडकीवर सोडण्यात येते. तिकीट बुकिंग खिडकीवर सोडताना तिकीट बुकिंग अधिकारी आरपीएफ.