आता प्रतीक्षा अभियांत्रिकी प्रवेशाच्या वेळापत्रकाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:13 AM2020-12-08T04:13:21+5:302020-12-08T04:13:21+5:30
जळगाव : सीईटी परीक्षेच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांचे अभियांत्रिकी प्रवेश वेळापत्रकाकडे लक्ष लागून आहे. सीईटीचा निकाल जाहीर होवून ...
जळगाव : सीईटी परीक्षेच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांचे अभियांत्रिकी प्रवेश वेळापत्रकाकडे लक्ष लागून आहे. सीईटीचा निकाल जाहीर होवून चार ते पाच दिवस उलटले आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
यंदा जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील १७ अभियांत्रिकी महाविद्यालयात ५ हजार ६४० जागा उपलब्ध आहे. फार्मसी पदवी प्रवेशासाठी १९ संस्थांमध्ये १ हजार ६०० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. इंजिनिअरिंग व फार्मसी प्रवेशासाठी महा सीईटीतर्फे घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर झाल्यामुळे विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, अद्याप प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे वेळापत्रकाकडे लक्ष लागून आहे.
प्राध्यापकांना दिले प्रशिक्षण
अभियांत्रिकीसाठी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरून घेतले जाते. यंदाही संपूर्ण प्रक्रिया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन होईल. त्यासाठी नुकतेच प्राध्यापकांना सुध्दा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेेचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
३ हजार १२० जागा उपलब्ध
जळगाव जिल्ह्यात इंजिनिअरिंगची १० महाविद्यालये आहेत. त्यात ३ हजार १२० जागा उपलब्ध आहेत. तर फार्मसीच्या ८ महाविद्यालयांत ६०० जागा आहेत. दरम्यान, इंजिनिअरिंगनंतर औद्योगिक क्षेत्रासह माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातही नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांचा कल तंत्रशिक्षणाकडे वाढला आहे. गेल्या काही वर्षांत औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रात नोकरी व व्यवसायाच्या संधी वाढल्याने फार्मसी पदवीसारख्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत असून त्यामुळे इंजिनिअरिंग, फार्मसीच्या महाविद्यालयांची संख्या वाढत आहे.