आता विधान परिषदेच्या उमेदवारीची प्रतीक्षा - एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:06 PM2020-03-15T12:06:20+5:302020-03-15T12:07:00+5:30
एका घरात दोन पदे नको म्हणून राज्यसभेची अपेक्षाच नव्हती
जळगाव : एकाच घरात दोन पदे नको म्हणून राज्यसभेच्या उमेदवारीची आपल्याला अपेक्षा नव्हती व ती उमेदवारी आपल्याला मिळणार नाही, हे माहित होतेच. आता विधान परिषदेच्या उमेदवारीचे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे, त्यामुळे त्याची प्रतीक्षा आहे, अशी माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगावात पत्रकारांशी बोलताना दिली. खडसे हे शनिवारी सकाळी मुंबई येथून जळगावात आले. त्या वेळी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विधान परिषद निवडणूक व जिल्हा बँकेच्या निवडणुकीविषयी चर्चा केली. राज्यसभेच्या उमेदवारीबाबत माहित होते राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले, रामदास आठवले यांच्यासह एकनाथराव खडसे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा गेल्या आठवड्यात होती. यात खडसे यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर या विषयावर खडसे म्हणाले की, घरात अगोदरच खासदार असल्याने एका घरात दोन पदे नको म्हणून राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळणार नाही हे माहिती होते व तशी अपेक्षाही नव्हती, असे खडसे यांनी स्पष्ट केले. आता विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्षांनी दिले आहे. त्यामुळे त्याची प्रतीक्षा असल्याचेही खडसे म्हणाले. जिल्हा बँक निवडणूक सर्व पक्षीय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व जिल्हा दूध संघात सर्व पक्षीय मिळून चांगले काम होत असून दोघीही ठिकाणी प्रगती होत आहे. त्यामुळे या वेळीही जिल्हा बँक निवडणूक सर्व पक्षीय पॅनल करून लढविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे एकनाथराव खडसे यांनी सांगितले. जिल्हा बँक निवडणूक घेण्याविषयी न्यायालयाचे आदेश आहे. या बाबत शासन आदेशानंतर जिल्हा बँकांच्या निवडणुका होणार असल्याचे खडसे म्हणाले. ही निवडणूक लढविण्याविषयी त्यांनी सर्व पक्षीय पॅनलला पसंती असल्याचे स्पष्ट केले.