आता वीकेण्ड घरातच; हॉटेलिंग राहणार बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:30+5:302021-06-28T04:12:30+5:30
स्टार ८५६ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही तोच डेल्टा विषाणूमुळे पुन्हा निर्बंध लागू झाल्याने ...
स्टार ८५६
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही तोच डेल्टा विषाणूमुळे पुन्हा निर्बंध लागू झाल्याने अनेक व्यवसायांवर बंधने आली आहेत. यात हॉटेल व्यवसायदेखील पुन्हा संकटात आला आहे. शनिवार, रविवार केवळ पार्सल सुविधा राहणार असल्याने वीकेण्डला हॉटेलिंग बंद झाले आहे. या दोन दिवस हॉटेलमध्ये ग्राहकांना प्रवेश नसण्यासह सोमवार ते शुक्रवार केवळ ४ वाजेपर्यंत ग्राहकांना प्रवेश राहणार आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिक व कर्मचारीही पुन्हा संकटात आले आहेत.
फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने लागू करण्यात आलेल्या ‘ब्रेक द चेन’मध्ये हॉटेल व्यवसाय अडचणीत येऊन केवळ पार्सल सुविधेची परवानगी देण्यात आली होती. परिणामी हॉटेल व्यवसाय पाच टक्क्यांवर आला होता. त्यानंतर ७ जूनपासून हा व्यवसाय पूर्ववत सुरू होत नाही, तोच आता पुन्हा डेल्टा विषाणूमुळे निर्बंध आले आहेत. ब्रेक द चेन काळात गावी गेलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा बोलावून व त्यांना हॉटेल व्यावसायिकांनी अगावू पगार (ॲडव्हान्स) दिला. २० दिवस व्यवसाय चालत नाही तोच पुन्हा बंधने आल्याने हे व्यावसायिक व कर्मचारीही संकटात आले आहेत. या सोबतच खवय्यांचेही वीकेण्डला हॉटेलिंग बंद होणार आहे.
सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमता
डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करताना अत्यावश्यक सेवावगळता इतर व्यवसायांना सोमवार ते शुक्रवारपर्यंत केवळ दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी दिली असून, शनिवार, रविवार ते बंद राहतील. यात हॉटेलदेखील सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. त्यानंतर केवळ पार्सल सुविधा राहणार असून, शनिवार, रविवारदेखील दिवसभर केवळ पार्सलचीच परवानगी आहे.
शहरातील एकूण हॉटेल - १६०
हॉटेलवर अवलंबून असलेले कर्मचारी - २०००
हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार
आता पुन्हा बंधने आल्याने कसा व्यवसाय करावा व कर्मचाऱ्यांनाही कसा पगार द्यावा, असा प्रश्न आहे. हॉटेलमालकांची आर्थिक अडचण होण्यासह कर्मचाऱ्यांचाही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हॉटेल व्यावसायिकांवर कर्जाचे हप्ते, मासिक भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार असा आर्थिक भार कायम आहे. दररोजची हॉटेलची वेळ वाढविण्यासह शनिवार, रविवारीही हॉटेल पूर्ण सुरू राहण्याची परवानगी मिळावी.
- लेखराज उपाध्याय, अध्यक्ष, जळगाव जिल्हा हॉटेल ॲण्ड टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशन.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या ‘ब्रेक द चेन’मध्ये हॉटेल व्यवसाय ९५ टक्क्यांवर आला होता. आता पुन्हा बंधने आल्याने हा व्यवसाय अडचणीतून बाहेर पडत नसल्याने चिंता वाढली आहे. हॉटेल दुपारी ४ वाजेपर्यंत बंद ठेवून त्याऐवजी दुपारी ४ ते रात्री १० अशी वेळ मिळावी.
- जितेंद्र कांकरिया, हॉटेल व्यावसायिक.
हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल
हॉटेलमालकांनी गावाकडून बोलविल्याने आम्ही परत आलो. त्यात येथे ॲडव्हान्स घेऊन ती रक्कम घरी पाठविली. आता मालक पैसे परत मागत असल्याने पैसे कसे उभे करावे, असा प्रश्न पडला आहे.
- उमेश राठोड, हॉटेल कर्मचारी.
गावीदेखील हाताला काम नसल्याने जळगावात परत आलो. यात भाड्याला पैसे नसल्याने उसनवारी केली. येथे मालकाकडून पैसे घेतले. आता पुन्हा व्यवसायावर बंधने आल्याने आमचीही चिंता वाढली आहे.
- हिरालाल शर्मा, हॉटेल कर्मचारी