गाळेधारकांच्या हक्कासाठी आता कुटुंबातील महिला आंदोलनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:12 AM2021-06-21T04:12:24+5:302021-06-21T04:12:24+5:30

जळगाव : गेल्या सहा दिवसांपासून गाळेधारकांनी मनपा प्रशासनाविरोधात साखळी उपोषण पुकारले असून, रविवारीदेखील गाळेधारक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले ...

Now in the women's movement in the family for the rights of the squatters | गाळेधारकांच्या हक्कासाठी आता कुटुंबातील महिला आंदोलनात

गाळेधारकांच्या हक्कासाठी आता कुटुंबातील महिला आंदोलनात

Next

जळगाव : गेल्या सहा दिवसांपासून गाळेधारकांनी मनपा प्रशासनाविरोधात साखळी उपोषण पुकारले असून, रविवारीदेखील गाळेधारक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते. विशेष म्हणजे आता गाळेधारकांच्या हक्कासाठी गाळेधारकांच्या कुटुंबातील महिलादेखील आता या आंदोलनात उतरल्या असून, रविवारी साखळी उपोषणाच्या ठिकाणी आंदोलनात सहभाग घेऊन, महिलांनी मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी अनेक महिलांना गाळेधारकांच्या व्यथा सांगताना अश्रूदेखील अनावर झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवसांपासून गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषण पुकारले आहे. सहाव्या दिवशीदेखील डॉ.शांताराम सोनवणे, पांडुरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, युवराज वाघ, वसीम काझी, सुजित किनगे, पंकज मोमाया, शिरीष थोरात उपस्थित होते. आता मनपा प्रशासन जर का लक्ष देणार नाही तर मुलं-बाळांनादेखील या आंदोलनात सहभागी करून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. रविवारी ॲड. विजय पाटील, लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, माजी नगरसेवक सुनील माळी, ताहेर शेख, माजी मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे, एस.टी. को-ऑपरेटिव्ह बँकचे कर्मचारी संचालक प्रदीप सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.

मनपाने मुद्दामहून सोडविला नाही प्रश्न

गाळे कराराचा तिढा सोडवणे शक्य असूनही गाळेधारकांकडून मोठे आर्थिक घबाड मिळेल या अपेक्षेने गेल्या ९ वर्षांपासून हा प्रश्न मनपाने सुटू दिला नाही असा आरोप गाळेधारकांनी केला आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून अवाजवी बिलांची रक्कम गाळेधारकांच्या माथी मारून, गाळेधारकांवर अन्याय करण्याची भूमिका मनपाने घेतली आहे. मात्र, गाळेधारकांच्या एकीकडे मनपाला हे शक्य झाले नसून, मनपाने कारवाई केली असती तर आतापर्यंत शेकडो गाळेधारकांच्या आत्महत्या झाल्या असत्या, असेही गाळेधारक संघटनेकडून काढण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, गाळेधारकांच्या व्यथा मांडताना, अनेक महिलांना अश्रू अनावर झाले होते. यामध्ये प्रभा परदेशी, संजीवनी कोल्हे, पुष्पा भारंबे, सुशीला चौधरी, हर्षा बोरोले, राजकुमारी भाटिया, कला भामरे यांचा समावेश होता.

मनपा प्रशासन मात्र आता कारवाईवर ठाम

एकीकडे गाळेधारकांचे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असताना, दुसरीकडे मात्र मनपा प्रशासनानेदेखील आता वसुलीसाठी तयारी सुरू केली आहे. मनपा प्रशासनाने शहरातील मुदत संपलेल्या मार्केटमधील मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. सुरुवातीला या मोठ्या थकबाकीदारांना मनपाकडून टार्गेट केले जाणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच महासभेने देखील एकप्रकारे पाठिंबा दिला असल्याने मनपाकडून आता कारवाई होणे अटळ आहे.

Web Title: Now in the women's movement in the family for the rights of the squatters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.