एनटीएस परीक्षेला ११० विद्यार्थ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:32 PM2019-11-20T22:32:12+5:302019-11-20T22:32:37+5:30
जळगाव : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्र शिक्षण परिषदेमार्फत दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) १७ ...
जळगाव : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) १७ नोव्हेंबरला जिल्ह्यातील ७ केंद्रांवर घेण्यात आली़ सुमारे २४८९ विद्यार्थ्यांपैकी २३७९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर ११० विद्यार्थ्यांनी दांडी मारली होती़
बुध्दीवान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, या सहाय्यातून त्यांची बृध्दीमत्ता विकसित व्हावी आणि त्या विकसित बुध्दीमत्तेने त्या विद्यार्थ्यांनी आपली विद्याशाखा व राष्ट्र सेवा करावी, हा या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेमागचा उद्देश आहे़ त्यामुळे दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येत असते़ दरम्यान, ही परीक्षा इयत्ता दहावीसाठी दोन स्तरावर घेण्यात येते़ त्यानुसार राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा १७ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली़
अशी मिळते शिष्यवृत्ती
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर अकरावी व बारावीपर्यंत दरमहा १२५० रूपये शिष्यवृत्ती दिली जाते़ नंतर सर्व शाखांच्या पदवीपर्यंत २ हजार रूपये तसेच सर्व शाखांच्या द्वितीय पदवीपर्यंत (पदव्युत्तर पदवीपर्यंत) दोन हजार आणि पीएच़डी़ साठी ४ वर्षापर्यंत विद्यापीठ आयोगाच्या नियमानुसार शिष्यवृत्ती दरमहा देण्यात येते़
२४८९ विद्यार्थ्यांची नोंदणी
राज्यस्तरीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या माध्यमातून आॅनलाईन अर्ज करण्यासाठी ६ आॅगस्ट ते २५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली़ त्यानुसार जिल्ह्यातील एकूण २४८९ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली होती़
२३७९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
एनटीएस परीक्षा ही नुकतीच जिल्ह्यातील पंकज सेंकडरी हायस्कूल (चोपडा), ए़बी़बॉइस स्कूल (चाळीसगाव), भुसावळ हायस्कूल (भुसावळ), के ़ नारखेडे स्कूल (भुसावळ), शेठ ला़ना़ विद्यालय, प़ ऩ लुंकड कन्या शाळा (जळगाव), आऱटीक़ाबरा विद्यालय (एरंडोल) या सात केंद्रांवर पार पडली़ यावेळी परीक्षेला २४८९ पैकी २३७९ विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले तर ११० विद्यार्थ्यांनी दांडी मारली़ दरम्यान, या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा १० मे २०२० रोजी देशभरात घेतली जाणार आहे.