जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने गाठली शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 10:53 PM2020-05-07T22:53:28+5:302020-05-07T22:54:25+5:30
एकाच दिवशी आढळले १५ रुग्ण, अमळनेरातील ७ जणांचा समावेश
जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवशी १५ अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येने गुरुवारी शंभरी गाठली आहे. या १५ मध्ये एकट्या अमळनेर शहरातील ७ रुग्णांचा समावेश आहे.
गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने दोन वेळा अहवाल जाहीर करण्यात आले. यात पहिल्या अहवालात पाच तर नंतर रात्री ९.४५ वाजता जाहीर केलेल्या अहवालात १० जण बाधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील ६० वर्षीय पुरूष, कांचननगर, जळगाव येथील ३५ वर्षीय महिला, पाचोरा येथील भीम नगरातील दोन जण, गिरडरोड येथील ४९ वर्षीय पुरूष, अंतुर्ली येथील ५० वर्षीय पुरूष तसेच शिवकॉलनी, माहिजी नाका येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दुसरीकडे अमळनेर येथील अमलेश्वर नगरातील सहा व माळीवाडा येथील एक अशा सात व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधित रूग्णांची संख्या १०० झाली असून त्यापैकी चौदा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.