कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने एसटीची प्रवासी संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:24 AM2021-02-23T04:24:36+5:302021-02-23T04:24:36+5:30
जळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यासह राज्यभरात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले ...
जळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यासह राज्यभरात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. त्याचा परिणाम एसटीच्या प्रवासी संख्येवरही झाला आहे. कोरोना रुग्णात सर्वत्र वाढ होत असल्यामुळे एसटीची अनेक मार्गावरची प्रवासी संख्या घटली असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.
कोरोनामुळे गेल्या वर्षी सहा महिने बंद असलेली राज्य परिवहन महामंडळाची सेवा चार महिन्यांपासून पूर्ववत सुरू झाली होती. राज्यासह परराज्यातही बससेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, गेल्या आठवडाभरापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे याचा एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येवरही झाला आहे. काही मार्गावरच्या सेवा वगळता नाशिक, पुणे, औरंगाबाद या मार्गावर प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभत आहे. यामध्ये सकाळच्या सत्रातील बसेसलाच प्रवाशांचा प्रतिसाद असून, या मार्गावरील दुपारच्या सेवेला मात्र प्रवाशांचा कमी प्रमाणात प्रतिसाद दिसून येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीमुळे नागरिकांकडून प्रवास टाळण्यात येत आहे. तालुका स्तरावरील सेवेवरही परिणाम जाणवत असल्याचे काही वाहकांनी सांगितले. सध्या शाळा-महाविद्यालय सुरू असल्यामुळे, विद्यार्थांची संख्या जास्त असल्याचेही सांगण्यात आले. विशेषत : शहरी भागासह ग्रामीण भागाच्या प्रवासी संख्येवरही परिणाम झाला आहे.
इन्फो :
सूचना करूनही मास्क ना सोशल डिस्टसिंगचे
जळगाव आगार प्रशासनातर्फे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना बसमध्ये चढण्यापूर्वी मास्क वापरण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. तसेच बसमध्येही सोशल डिस्टसिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, असे असतांना बहुतांश प्रवासी विना मास्क आढळून आले. या विना मास्क प्रवाशांमध्ये वयोवृद्ध नागरिकांची संख्या जास्त दिसून आली. तसेच बसमध्ये प्रवाशांची संख्या मर्यादित झाल्यानंतरही वाहकांकडून अनेक प्रवाशांना बसमध्ये प्रवेश नाकारण्यात येत आहे. मात्र, प्रवाशी सोशल डिस्टसिंगचे कुठलेही पालन न करता, बसमध्ये गर्दी करतांना दिसून आले.
इन्फो :
पुणे,औरंगाबाद मार्गावर निम्मे प्रवासी
- सध्या रेल्वे गाड्यांची संख्या अपूर्ण असल्यामुळे महामंडळाला कोरोनानंतर पुणे मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. रात्रीच्या दोन शिवशाही बसेसचे पूर्ण क्षमतेने आरक्षण होत होते. मात्र, आठवडाभरापासून कोरोना रुग्ण वाढल्याने, या मार्गावरची प्रवासी संख्या घटली असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.
- तसेच पुणे पाठोपाठ औरंगाबाद मार्गावरही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून या मार्गावरचे प्रवासींही घटले असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
- एसटीने रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या २५ हजार
- लॉकडाऊन खुले केल्यानंतरची संख्या १८ ते २० हजार
-एसटी सध्या प्रवास करणाऱ्यांची संख्या १२ ते १५ हजार
इन्फो :
या मार्गावर बसेसच्या फेऱ्या कमी
- कोरोनानंतर एसटी महामंडळाची सर्व गावांना सेवा सुरू झाली असली तरी, फेऱ्यांची संख्या मात्र कमी करण्यात आलेली आहे. नाशिक, औरंगाबाद, धुळे, शिरपूर यासह इतर ग्रामीण भागातील गावांचा यामध्ये समावेश आहे.
- विशेषत: ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या संख्या कमी असल्यामुळे, फक्त शाळकरी विद्यार्थांसाठीच शाळेच्या वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यात येत आहेत. तर चाळीसगाव,पाचोरा, अमळनेर या गावानांच सध्या रेल्वे नसल्यामुळे जादा बसेस सोडण्यात येत असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.