जळगावात कोरोना चाचण्यांची संख्या दुपटीने वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:15 AM2021-04-14T04:15:00+5:302021-04-14T04:15:00+5:30
जळगाव : गेल्या महिनाभराच्या तुलनेत एप्रिलमध्ये दुपटीने चाचण्या वाढविण्यात आल्या आहे. यात शासकीय यंत्रणेत अधिक चाचण्या होत आहेत. तर ...
जळगाव : गेल्या महिनाभराच्या तुलनेत एप्रिलमध्ये दुपटीने चाचण्या वाढविण्यात आल्या आहे. यात शासकीय यंत्रणेत अधिक चाचण्या होत आहेत. तर खासगी लॅबमध्ये दिवसाला १ हजार ते १५०० चाचण्या केल्या जात आहेत. गेल्या दहा दिवसांपासून दिवसाला दोनही यंत्रणेमध्ये दहा हजारांच्या आसपास चाचण्या होत आहेत.
शासकीय यंत्रणेत आरटीपीसीआर चाचण्या केल्यानंतर याचे अहवाल येण्यासाठी किमान दोन दिवसांचा अवधी लागतो तर खासगी यंत्रणेत मात्र २४ तासात रिपाेर्ट मिळत असल्याचे चित्र आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल संशयित रुग्णांचे स्वॅब घेतल्यानंतर यांचे अहवाल मात्र, २४ तासातच मिळत आहेत. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन या केंद्रावर ॲन्टिजेन व आरटीपीसीआर या दोनही चाचण्या केल्या जात आहेत. जिल्ह्यात एकूण ७ लाख ५० हजार १८८ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यात दिवसाला सरासरी १ हजार चाचण्या या खासगी लॅबमध्ये होत असून उर्वरित ८ ते ९ हजार चाचण्या या दिवसाला शासकीय यंत्रणेत होत आहेत. बाधितांचे प्रमाण हे गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांच्या तुलनेत कमी झाले आहे.