मृत्यू पावलेल्या जनावरांची संख्या दोनशेच्या घरात! बाधीत पशुधनाची संख्या अडीच हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2023 02:30 PM2023-09-08T14:30:53+5:302023-09-08T14:32:48+5:30
‘लम्पी’मुळे चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक हानी.
कुंदन पाटील, जळगाव : ‘लम्पी’ आजाराने जिल्ह्यात आतापर्यंत १९७ जनावरांचे बळी घेतले आहेत. त्यात ११२ जनावरे एकट्या चाळीसगाव तालुक्यातील असून आतापर्यंत २६३७ पशुधनाला ‘लम्पी’ची बाधा झाली आहे.
दरम्यान, लम्पीच्या संक्रमणामुळे सुरुवातीला जिल्ह्यातील ७ पशुधनांचा आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. आता मात्र जिल्ह्यातील सर्वच आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. तसेच लसीकरण मोहिमही पूर्ण झाली असून प्रशासनाकडून चाळीसगावमध्ये दारोदारी पाहणी करण्यात येत आहे. ‘लम्पी’ पाय पसरवतच चालल्याने पशुधन मालकही चिंतेत आहेत. ऐन हंगामात पशुधनांचा जीव धेाक्यात आल्याने अनेक जण सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात धाव घेत आहेत.
पाच तालुक्यांना सर्वाधिक फटका
चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव आणि एरंडोल या तालुक्यात बाधीत जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तर मुक्ताईनगर,भुसावळ, बोदवड व यावल तालुक्यात एकही जनावर बाधीत नाही.त्यामुळे या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तालुकानिहाय जनावरांचा मृत्यू
जळगाव-०२
पाचोरा-२२
अमळनेर-०४
एरंडोल-१८
चाळीसगाव-११२
जामनेर-०१
भडगाव-१९
चोपडा-०१
रावेर-००
धरणगाव-०४
पारोळा-१४