पुण्याची प्रवाशी संख्या निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:15 AM2021-03-24T04:15:26+5:302021-03-24T04:15:26+5:30
कोरोना परिणाम : जिल्हा बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यापासून कोरोनाने पुन्हा डोके ...
कोरोना परिणाम : जिल्हा बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या आठवड्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर महामंडळाच्या प्रवासी संख्येवर झाला आहे. यामध्ये नेहमी उत्स्फूर्त प्रतिसाद असलेल्या पुण्याच्या मार्गावरील प्रवाशांची संख्या निम्म्यावर आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रवाशांनी तिकीट आरक्षणाकडे पाठ फिरवून, बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या निम्म्यावर आली आहे.
कोरोनामुळे महामंडळाची सेवा सहा महिने बंद होती. कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने महामंडळाची सेवा पूर्ववत सुरू झाली. महामंडळातर्फे सर्व लांब पल्ल्याच्या मार्गावरच्या बसेस सुरू करण्यात आल्या. यामध्ये पुणे, वसई, लातूर व परराज्यातील बसेससाठी आरक्षणाची सुविधाही सुरू करण्यात आली. यामुळे प्रवाशांचा या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. परंतु,आता कोरोनामुळे पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, प्रवाशांची संख्या निम्म्यावर आली आहे.
इन्फो :
मुख्यालयातून ,सध्या ३०० फेऱ्या
महामंडळाच्या जळगाव विभागातील जळगाव आगार हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, या ठिकाणाहून राज्यात सर्व ठिकाणी बसेस सुटतात. कोरोनापूर्वी जळगाव आगारातून दिवसभरात ५०० ते ५५० फेऱ्या व्हायच्या.मात्र,आता कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटल्याने, सध्या जळगाव आगारातून ३०० फेऱ्या होत आहेत.
इन्फो :
सर्व मार्गावरील बसेसच्या आरक्षणाला अल्प प्रतिसाद
सध्या जळगाव आगारातून वसई, पुणे, लातूर, सेलवास, वापी या मार्गावरील बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना एक महिना आधी या बसेसचे आरक्षण करण्याची सुविधा आहे.मात्र, कोरोनामुळे या सर्व मार्गावरील बसेसचे आरक्षण घटले आहे. यात बहुतांश मार्गावरील आरक्षण संख्या निम्म्यावर आली असून, काही मार्गावर आरक्षणही होत नसल्याची माहिती देण्यात आली.
इन्फो :
रातराणीची फक्त एकच बस
सध्या जळगाव आगारातून वसई येथेच रातराणी बस सेवा सुरू आहे. दररोज जळगाव आगारातून सायंकाळी ही बस सुटत असते. सुरुवातीला या बसला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मात्र, आता कोरोनामुळे या रातराणी बसलाही प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
जिल्हाबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली
दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे महामंडळाच्या सेवेला टप्प्याटप्प्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. आगार प्रशासनातर्फे सर्व मार्गावरच्या फेऱ्या नियमित करण्यात आल्या होत्या. मात्र,गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने, प्रवाशी संख्या घटू लागली आहे. परिणामी जिल्हाबाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी घट निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.
इनफो
सध्या कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटली असून,यामुळे जळगाव सह जिल्हाभरातून ९०० फेऱ्या कमी केल्या आहेत. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पुन्हा फेऱ्या पूर्ववत करण्यात येतील.
दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी