रुग्णसंख्या घटली, दुकानांना परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:15 AM2021-05-22T04:15:49+5:302021-05-22T04:15:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आता २० ते २५ टक्केवर आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आता २० ते २५ टक्केवर आली असून अत्यावश्यक सेवेसह इतर सर्व दुकानांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी फाम संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढला तेव्हापासून व्यापार क्षेत्राला मोठ्या झळ सहन कराव्या लागत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यामध्ये नवरात्र, दिवाळी काळात व्यवसाय सुरू होऊन हळूहळू तो पूर्वपदावर येत असतानाच फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला व यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे व्यापारी वर्ग हवालदिल झाला असून त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
सरकारने कोरोना नियंत्रणासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन व्यापारी वर्गाने करीत आपला व्यवसाय बंद ठेवला. आता जळगाव जिल्ह्यात १२०० च्या पुढे गेलेली रुग्णसंख्या ३५० वर आली असून ही दिलासादायक बाब आहे. कोरोना नियंत्रणात येत असल्याने आता सर्वच व्यवहार सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर सर्व व्यवहार सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, सरकारने कोरोना विषयी घालून दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करण्यात येईल, यासाठी अधिकाऱ्यांनी देखील नियंत्रण ठेवावे, व्यवसाय करताना ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहतील यासह कोरोना विषयीच्या सर्वच नियमावलीचे पालन व्यापारीवर्ग करेल. या सर्व गोष्टींचा विचार करून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी फाम संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ललित बरडिया यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निर्बंध काळापासून आतापर्यंत कोरोनाची झालेली घसरण
६ एप्रिल - ११७६
१२ एप्रिल १२०१
२२ एप्रिल १०३४
१ मे ९३६
३ मे ८०२
१३ मे ७८९
१६ मे ६३१
१८ मे ५२१
२० मे ३५७