एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यांत रुग्णसंख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:17 AM2021-04-28T04:17:08+5:302021-04-28T04:17:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात १५ फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग वाढायला सुरुवात झाली. या दुसऱ्या लाटेत एप्रिलच्या तिसऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात १५ फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग वाढायला सुरुवात झाली. या दुसऱ्या लाटेत एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून आता काहीसा दिलासा मिळाला असून पहिल्या दोन आठवड्यांच्या तुलनेत नंतरच्या आठवड्यांमध्ये रुग्णंसख्या घटली आहे. या पूर्ण २६ दिवसांमध्ये जिल्ह्यात २८ हजार ८९८ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून रुग्णसंख्या ही १ हजार व ११०० यामध्ये स्थिर आहे. शिवाय बरे होण्याचे प्रमाण त्या तुलनेत वाढले आहे. यामुळे यंत्रणेवरचा ताण मात्र काहीसा हलका झाला आहे. बेडसाठी होणारी धावपळ काहीशी कमी झाली आहे. ऑक्सिजनचे बेड हे लवकर उपलब्ध होत आहेत.
दिलासादायक चित्र
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या चार ते पाच दिवसांपासून प्रथम आपत्कालीन विभागातील दोन ते तीन बेड रिक्त राहत आहेत. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एका बेडवर दोन रुग्ण, काही रुग्ण खुर्चीवर अशी बिकट परिस्थिती होती. मात्र, मंगळवारी या कक्षात ३ बेड रिक्त होते. शिवाय सोमवारीही तीन ते चार बेड रिक्त होते. हे चित्र दिलासादायक असून रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
असे आहेत आकडे
मार्चमध्ये बाधित २८१४०
२६ एप्रिलपर्यंत बाधित २८८९८
आठवड्यांची स्थिती
१ ते ७ एप्रिल : ८०८१
७ ते १४ एप्रिल : ८०३७
१४ ते २१ एप्रिल : ७५३४
२१ ते २६ एप्रिल : ५२४६
संख्येत तफावत, मात्र काय सांगतो अहवाल?
नॅशनल हेल्थ मिशनद्वारे दर आठवड्याची रग्णसंख्या व मृत्यूचा एकत्रित आढावा घेऊन जिल्ह्याची परिस्थिती मांडली जाते. या अहवालात गेल्या आठवड्यात मृत्यूची संख्या ३६ ने घटल्याचे दर्शविण्यात आले आहे. बाधितांचे प्रमाण, रुग्णवाढीचा वेग, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण या सर्वच बाबतीत जिल्ह्याची कामगिरी ही सरस असून केवळ मृत्युदर हा राज्याच्या मृत्युदरापेक्षा अधिक असल्याने याबाबतीत जिल्ह्याला रेड सिग्नल मिळाला आहे. मात्र, नियमित प्रशासनाकडून येणारी आकडेवारी व या अहवालातील आकडेवारीत मोठी तफावत आहे.
एनएचएमचा अहवाल असा
१२ ते १८ एप्रिल मृत्यू : ११७
१९ ते २५ एप्रिल : ८१
जिल्ह्याचा डबलिंग टाइम : ७५.९८,
राज्याचा डबलिंग टाइम : ४३.२६
जिल्ह्याचा रिकव्हरी रेट : ८६.४६,
राज्याचा रिकव्हरी रेट : ८२.१९
जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट : १०.६५,
राज्याचा पॉझिटिव्ह रेट : १७.४१