महिनाभरात तीव्र कुपोषित बालकांची संख्या ८५८ ने वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:21 AM2021-08-12T04:21:42+5:302021-08-12T04:21:42+5:30
आनंद सुरवाडे जळगाव : जिल्हाभरात कुपोषित बालकांच्या जुलै महिन्यातील सर्व्हेक्षणाची संपूर्ण आकडेवारी समोर आली आहे. तीव्र कुपोषित बालकांची संख्या ...
आनंद सुरवाडे
जळगाव : जिल्हाभरात कुपोषित बालकांच्या जुलै महिन्यातील सर्व्हेक्षणाची संपूर्ण आकडेवारी समोर आली आहे. तीव्र कुपोषित बालकांची संख्या वाढून १३४५ वर पोहोचली आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या महिनाभरातच ही संख्या ८५८ ने वाढली आहे. दरम्यान, याबाबीमुळे नेमक्या उपाययोजना गेल्या कुठे ? प्रशासन, लोकप्रतिनिधी करताय काय? निधी जातोय कुठे असे असंख्य प्रश्न यातून समोर आले आहेत.
जिल्हाभरात कुपोषित बालकांचे नव्याने सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना नवीन सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात जिल्हाभरात हा सर्व्हे घेण्यात आला. त्यात २ लाख ४७ हजार ७८३ बालकांचे वजन घेण्यात आले. आरोग्य विभागाच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून हा सर्व्हे घेण्यात आला. दरम्यान, १५ ऑगस्टनंतर पुन्हा एकदा जिल्हाभरात हा सर्व्हे होणार असून त्यात आणखी काही बालके समोर येणार आहे.
गंभीर आकडे
कमी वजनाची बालके : २५१४८(गेल्या सर्व्हेक्षणाच्या तुलनेत १०४१ ने वाढ)
तीव्र कमी वजनाची बालके : ४२२८ (गेल्या सर्व्हेक्षणाच्या तुलनेत ८५६ ने वाढ)
मध्यम कुपोषित ६२०२ (गेल्या सर्व्हेक्षणाच्या तुलनेत ३२५१ ने वाढ)
तीव्र कुपोषित बालके १३४५ (गेल्या सर्व्हेक्षणाच्या तुलनेत ८५८ ने वाढ)
लोकप्रतिनिधी करताय काय?
आसराबारी येथे कुपोषित बालकाचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील कुपोषणाचा विषय ऐरणीवर आला आहे. आता त्याकडे गांर्भियाने बघण्याची गरज आहे. मात्र, कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून याचा पाठपुरावा होत नसल्याची गंभीर माहिती आहे. यात आमदार, जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य या भागातील लोकप्रतिनिधी नेमके करताय काय? हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या भागातील जि. प. सदस्यांनी एकाही सर्वसाधरण सभेत किंवा कोणत्याही सभेत कुपोषणाचा मुद्दा मांडलेला नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या बाबतीत अत्यंत संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.
अहवाल आज सादर होणार
आसराबारी येथील कुपोषित बालकाच्या मृत्यूप्रकरणात जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंग परदेशी यांच्या समितीने या ठिकाणी जावून चौकशी केली आहे. त्यांचा चौकशी अहवाल हा बुधवारी जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.पंकज आशिया यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रकरणात नेमकी कारवाई कुणावर होणार कुणावर ठपका ठेवण्यात आला आहे?. याबाबत उद्या स्पष्टता होणार आहे.
चोपडा, यावलमध्येच परिस्थिती गंभीर
आदिवासी गावांचा समावेश असलेल्या चोपडा व यावल तालुक्यातच कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक वाढली आहे. विशेष बाब म्हणजे मृत्यू झालेला बालक यावल तालुक्यातीलच रहिवासी आहे. शिवाय या भागात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची जबाबदारी ही प्रभारी अधिकाऱ्यांवर असून या भागात अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा प्रकार यातून समोर आला आहे. चोपड्यात गेल्या सर्व्हेक्षणात ३५ तीव्र कुपोषित बालके होती ही संख्या १७३ वर पोहोचली आहे. तर यावल तालुक्यात गेल्या सर्व्हेक्षणात तीव्र कुपोषित बालकांची संख्या ३९ होती. ती वाढून १८३ वर पोहोचली आहे. तर चाळीसगावात तीव्र कुपोषित बालकांची संख्या २१४ नोंदविली गेली आहे जी सर्वाधिक आहे.