१ ऑगस्टपासून कागदपत्रांच्या पडताळणीची संख्या वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:19 AM2021-07-14T04:19:03+5:302021-07-14T04:19:03+5:30
जळगाव : `अनलॉक` नंतरही पासपोर्ट प्रशासनातर्फे कोरोनाचे कारण सांगून, नागरिकांना पासपोर्टसाठी कागदपत्रांच्या पडताळणीकरिता महिनाभराने तारीख देण्यात येत असल्यामुळे नागरिकांची ...
जळगाव : `अनलॉक` नंतरही पासपोर्ट प्रशासनातर्फे कोरोनाचे कारण सांगून, नागरिकांना पासपोर्टसाठी कागदपत्रांच्या पडताळणीकरिता महिनाभराने तारीख देण्यात येत असल्यामुळे नागरिकांची सध्या चांगलीच गैरसोय सुरू आहे. नागरिकांच्या गैरसोयी बाबत `लोकमत`ने १० जुलै रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर या वृत्ताची पासपोर्ट प्रशासनाने दखल घेऊन, १ ऑगस्ट पासून कागदपत्रांच्या पडताळणीची संख्या वाढविण्यात येणार आहे.
कोरोनापूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर तीन ते चार दिवसातच नागरिकांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तारीख दिली जात होती. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर १० ते १२ दिवसांनी नागरिकांना पासपोर्ट मिळत होता. मात्र, आता अनलॉकनंतरही पासपोर्ट प्रशासनातर्फे कोरोनाचे कारण सांगून, नागरिकांना पासपोर्टसाठी कागदपत्रांच्या पडताळणीकरिता महिनाभराने तारीख देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या हातात पासपोर्टही विलंबाने मिळत आहे. तसेच पूर्वी दिवसभरात ८० ते १०० नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जायची. मात्र, आता कोरोनामुळे महिना ते दीड महिन्यानंतर नागरिकांना तारीख मिळत असून, सध्या दररोज २० ते २५ नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी होत आहे. हजारोच्या संख्येत पासपोर्टसाठी अर्ज करण्यात येत असतांना, पासपोर्ट प्रशासनातर्फे मात्र २५ ते ३० नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी होत असल्यामुळे, नागरिकांमधुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
इन्फो :
१ ऑगस्टपासून पूर्वीप्रमाणे संख्या वाढविणार
`लोकमत`च्या वृत्तानंतर पासपोर्ट प्रशासनाने १ ऑगस्ट पासून पूर्वीप्रमाणे कागदपत्रांच्या पडताळणीची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत तसे नियोजन सुरू असल्याचे स्थानिक पासपोर्ट अधिकारी गणेश मोगवीरा यांनी `लोकमत`ला दिली. कागदपत्रांची पडताळणीची संख्या वाढल्यामुळे आता नागरिकांना आता पासपोर्ट वेळेवर मिळणार आहे.