जळगावजवळील मण्यारखेडा तलावात असंख्य माशांचा मृत्यू, प्रशासनाकडून पंचनामा

By अमित महाबळ | Published: June 15, 2024 07:55 PM2024-06-15T19:55:15+5:302024-06-15T19:55:50+5:30

मण्यारखेडा तलावात आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था यांनी लाल परी, कतला, ब्रिगेड प्रकारातील मत्सबीज सोडले होते. तलावात मासेमारी करून मच्छीमार उदरनिर्वाह करतात.

Numerous fishes died in Manyarkheda lake near Jalgaon, Panchnama from the administration | जळगावजवळील मण्यारखेडा तलावात असंख्य माशांचा मृत्यू, प्रशासनाकडून पंचनामा

जळगावजवळील मण्यारखेडा तलावात असंख्य माशांचा मृत्यू, प्रशासनाकडून पंचनामा

अमित महाबळ

जळगाव : तालुक्यातील मण्यारखेडा तलावात अनेक माशांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी, सकाळी उघडकीस आली. यामुळे खळबळ उडाली आहे. एमआयडीसीतून वाहून येणारे प्रदूषित पाणी, प्लास्टिक चटई उद्योगातील वेस्ट मटेरियल यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे, तर शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी समन्वयातून जागेवर पंचनामा करण्यासह मृत माशांचे व पाण्याचे नमुने पुढील तपासणीसाठी संकलित केले आहेत.

मण्यारखेडा तलावात आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था यांनी लाल परी, कतला, ब्रिगेड प्रकारातील मत्सबीज सोडले होते. तलावात मासेमारी करून मच्छीमार उदरनिर्वाह करतात. शनिवारी, ते मासेमारी करण्यासाठी आले असता, तलावाच्या काठावर असंख्य मृत मासे आढळून आले. मत्सबीज टाकल्यानंतर ते सहा महिन्यानंतर निघायला लागते. मे महिन्यापासून मासे काढायला सुरुवात होते. दोन दिवसांपासून मासे मरत होते पण शनिवारी मोठ्या प्रमाणात मेलेले मासे आढळून आले. यामुळे मच्छीमार संस्थेचे आर्थिक नुकसान झाले आहे. ४० ते ६० क्विंटल माशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

असा सुरू झाला फॉलोअप...

घटनेची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना समजताच त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळवले. या दरम्यान, तहसीलदार शीतल राजपूत यांनाही माहिती देण्यात आली. आरोग्य अधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी, त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना माहिती कळवली. थोड्याच वेळात प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. महसूल विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, आरोग्य विभाग, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी समन्वय साधून घटनास्थळी पंचनामा, नमुने संकलन आदी कार्यवाही पूर्ण केली. यावेळी पोलीस पाटील उपस्थित होते.

गावात सर्वेक्षण सुरू...

या घटनेनंतर आरोग्य विभागाच्या माध्यमातून तातडीने मण्यारखेडा गावात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पुढील आणखी दोन दिवस ते सुरू राहील. या दरम्यान विषबाधा, डायरियाची लक्षणे कोणात आढळून येतात का ? याची पाहणी केली जाणार आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना बाधा झाल्यास सुरुवातीला उलटी, जुलाब आदी लक्षणे आढळून येतात.

पाण्यापासून लांब रहा, दवंडी देत आवाहन

मेलेले मासे तलावाच्या काठावर आले होते. काही मुलांनी ते विकण्यासाठी गोळा केले होते. त्यांच्याकडून ते जप्त करण्यात आले आहेत. तलावातील पाणी वापरू नये. गुरांना पिऊ देऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने दवंडी देत गावात करण्यात आले आहे.

पंचनामा केला...

घटनास्थळी वेगवेगळ्या शासकीय विभागांनी समन्वय साधून पंचनामा केला. तलावातील पाणी वापरू नये. गुरांना पाजू नये, असे आवाहन मन्यारखेडा गावात दवंडी देऊन केले आहे, अशी माहिती तहसीलदार शीतल राजपूत यांनी दिली. 

दरवर्षी समस्या येते...

एमआयडीसीतून वाहत येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे दरवर्षी मण्यारखेडा तलावातील मासे मरतात. याबाबत प्रशासनाने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. या घटनेत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था चेअरमन बाळासाहेब सैंदाणे यांनी केली आहे.

Web Title: Numerous fishes died in Manyarkheda lake near Jalgaon, Panchnama from the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.