परिचारिका म्हणाल्या, आमची चूक झाली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:27 AM2019-01-23T11:27:42+5:302019-01-23T11:27:50+5:30
वैद्यकिय महाविद्यालयातील छम् छम्
जळगाव : शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरुग्ण कक्षात हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाच्या नावाने झालेल्या लावणी व नाचगाण्याच्या कार्यक्रमाची प्रसारमाध्यमातून टीका होताच त्यात सहभागी झालेल्या परिचारिकांनी माफीनामा लिहून दिला आहे. आमच्याकडून चूक झाली, भविष्यात असे कृत्य करणार नसल्याचे यात म्हटले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरुग्ण कक्षातील एका खोलीत १७ जानेवारी रोजी दुपारी परिचारिका व अधिपरिचारिकांनी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या नावाखाली परिचारिकांनी हिंदी, मराठी गाणे, रिमीक्स गाणे व लावण्या सादर करुन वाद्याच्या तालावर ठेका धरल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी उघड झाला.
प्रसारमाध्यमातून टीका होताच वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉ.विजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती नेमली. या समितीने मंगळवारी आठ जणांचा खुलासा घेतला तर या १३ परिचारिकांनी स्वतंत्र माफिनामाच सादर केला.
समितीच्या सदस्यांनी हा माफिनामा अधिष्ठाता डॉ.खैरे यांना वाचून दाखविला. दरम्यान, यासंदर्भात मंगळवारी डॉ.खैरे यांच्या दालनात वैद्यकिय अधीक्षक डॉ.किरण पाटील, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.दत्तात्रय बिराजदार, समिती सदस्य सविता अग्निहोत्री व निरीक्षक सुनील गायकवाड यांची बैठकही झाली. त्यात समितीचा अहवाल आल्यानंतर करावयाच्या कारवाईबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तात्याराव लहानेंनी घेतली दखल
परिचारिकांच्या छम् छम् प्रकरणाची वैद्यकिय शिक्षण सहसंचालक डॉ.तात्याराव लहाने यांनी गंभीर दखल घेतली असून मंगळवारी अधीष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्याशी त्यांनी दूरध्वनीवर संपर्क साधून माहिती घेत या प्रकाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे डॉ.खैरे यांनी डॉ. लहाने यांना सांगितले. या वृत्तास डॉ.खैरे यांनी दुजोरा दिला.
चौकशी समितीने पहिल्या दिवशी आठ जणांचे जबाब नोंदविले आहेत. तसेच १३ परिचारिकांनी माफीनामाही लिहून दिला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत अहवाल मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. डॉ.विजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
-डॉ.भास्कर खैरे, अधिष्ठाता,शासकीय वैद्यकिय महाविद्यालय
४बालरुग्ण कक्षातील छम् छम् प्रकरणात दोषी परिचारिकांवर कठोर कारवाई करावी, यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या शोभा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मंगळवारी अधिष्ठातांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी वैद्यकिय महाविद्यालय गाठून आंदोनल रोखले तर अधिष्ठातांनीही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.