धोका पत्करून परिचारिकांची ‘कोरोना’शी लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:24 AM2020-05-12T00:24:05+5:302020-05-12T00:27:47+5:30
जीवाभावाच्या सिस्टरला मंगळवार, दि. १२ मे रोजी साजऱ्या होणाºया जागतिक परिचारिका दिनानिमित्त सलाम.
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : माणूस अंथरुणाला खिळला, एखादा आजार जडला की रक्ताचे नाते ही सैल होते. आपलीच माणसे दुरावतात. अशावेळी रक्ताचे कुठलेही नाते नसताना आणि कोणतेही नात्याचे संबंध नसताना रुग्णालयात आपलं म्हणून साथ देते. औषध देते. मानसिक आधारही तीच देते. काही सांगावे असे वाटले तर ऐकनारे देखील तीच असते. अशा या जीवाभावाच्या सिस्टरला मंगळवार, दि. १२ मे रोजी साजऱ्या होणाºया जागतिक परिचारिका दिनानिमित्त सलाम.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २४ तास सतर्क राहून रात्री-बेरात्री सामान्य रुग्णांचा, कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी नेहमी रुग्णालयातील परिचारिका सेवा देत आहे. धोका पत्करून ही सेवा सुरू असल्याचे परिचारिका नमूद करतात.
पालिका रुग्णालयाच्या परिचारिका माला सुरेश पवार यांनी गेल्या महिनाभरापासून ११ वर्षाच्या मुलास व ६ वर्षीय मुलीची भेटसुद्धा घेतलेली नाही. रुग्णांची सेवा करत असताना हल्ली स्थितीमध्ये धोका पत्करत अहोरात्र रुग्णांच्या सेवेत आहे. मुलाबाळांना आपल्यापासून धोका होऊ नये याकरिता पवार या परिचारिकेने आपले दोन्ही मुलं आईवडिलांकडे साभाळणयासाठी दिले आहेत. घरी आल्यावर आपल्यापासून कुटुंबीयांना धोका नको म्हणून रुग्णालयाचे ड्रेस व इतर साहित्य बाहेर एका खोलीत ठेवावी लागते. एका वेगळ्या खोलीमध्ये गेल्या दीड महिन्यापासून वास्तव्य आहे. पतीदेव सोबतही लांबूनच बोलणं होत आहे. अनेक वर्षांपासून रुग्णसेवा करीत असताना असा अनुभव कधीच आला नाही. कुटुंबीयांची काळजी वाटते. मात्र कर्तव्यही तितकेच महत्त्वाचे आहे. रुग्णालयात प्रत्येक रुग्णना सेवा देणारे आद्यकर्तव्य आहे . सद्य:स्थितीत येणारा प्रत्येक रुग्ण हा भयभीत व घाबरलेला दिसून येत आहे. त्यांना मानसिक आधार देणे फार महत्त्वाचे आहे. शिवाय वेळेवर औषध उपचार दिले जातातच. रुग्णांना आत्मविश्वास वाढवून हिंमत देणे अत्यंत गरजेचे आहेत. रुग्णसेवा करत असताना मात्र कुटुंबीयांची विरहामुळे डोळे पाणावून येतात.
एखाद्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्या रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी व परिसरातील लोकांना जनजागृती करण्यासाठी व तपासणीसाठी जावे लागते. अंगावर शहारे आणणारे अनुभव येत आहे. अनेक वेळा जनसामान्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळते.
रुग्णांची सेवा करत असताना मनाला समाधान मिळते. कुटुंबाचा विरह वेदनादायी आहे. कर्तव्य असल्यामुळे त्याला इलाज नाही. शेवटी रुग्णांची सेवाही तितकीच महत्वाची आहे.
-माला पवार, परिचारिका, पालिका रुग्णालय, भुसावळ
महिनाभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगळी रूम घेऊन राहावे लागत आहे .आपल्यापासून इतर लोकांना त्रास होऊ नये तसेच रुग्णालयात सतर्क राहून रुग्णांची सेवा व त्यांना मानसिक आधार देणे अत्यंत गरजेचे आहे.
-सोनल नाथजोगी, परिचारिका, पालिका रुग्णालय, भुसावळ