नागपूर, पुण्यापेक्षा जळगावातील पोषण आहार मसाला दुपटीने महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:53 AM2020-01-15T11:53:01+5:302020-01-15T11:53:39+5:30
विद्यार्थ्यांऐवजी पुरवठादाराचेच 'पोषण'
जळगाव : शालेय पोषण आहारात वापरल्या जाणाऱ्या धान्यादी मालाचे दर हे पुणे, नागपूर येथील दरांच्या तुलनेतही तब्बल दुपटीने अधिक असल्याचे समोर आले आहे़ पुरवठादाराकडून पुरविण्यात येणाºया या मालाचे दर गगनाला भिडणारे असताना त्याच्या गुणवत्तेवर मात्र अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असून तक्रारदार रवींद्र शिंदे यांनी शाळेत वापरला जाणारा हा धान्यादी माल मंगळवारी जिल्हा परिषदेत आणला होता़ या प्रकारातून पुरवठादार व यंत्रणेचेच पोषण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे़
शालेय पोषण आहारात लागणाºया धान्यादी माल पुरविण्यासंदर्भात गुनिना कमर्शियल व शासनात फेब्रुवारी २०१९ मध्ये करार करण्यात आलेला आहे़ यात हे सर्व दर देण्यात आले आहे़ बाजारात तेजी-मंदी कुठलीही परिस्थिती असताना दर कमी असतानाही हे दर मात्र, त्याच दराने महिने टू महिने सुरू आहे़ गुनिना कमर्शियल यांचे स्वत:चे हे प्रोडक्ट असून त्याचा पुरवठा शाळांना करण्यात येतो़
जिल्हाभरातील २७०० शाळांना हा पुरवठा केला जातो़ याचे दोन महिन्याचे बिल साडे तीन ते चार कोटींच्या घरात असते़ बाजारातील दरांपेक्षा या मालातील अनेक मालाचे दर हे तब्बल दुपटीने अधिक आहेत़ त्या मानाने गुणवत्ता नसल्याच्या तक्रारी अनेकदा समोर आल्या आहेत़ अशा स्थितीत शासन स्तरावरून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे़ वारंवार हा मुद्दा मांडूनही दुर्लक्ष होत असल्याने यात तक्रारदार व माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी हा धान्यादी माल मंगळवारी जिल्हा परिषदेत पाहण्यासाठी आणलेला होता़
सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मालाची गुणवत्ता व दरातील तफावत हे मुद्दे ते मांडणार होते़ मात्र, सीईओ डॉ़ पाटील हे अन्य कार्यक्रमांमध्ये असल्याने भेट होऊ शकली नाही, मात्र, जिल्हा परिषदेत काही सदस्यांनी हा विषय समजून घेतला असून आगामी सभामध्ये याबाबत जाब विचारू असे आश्वासन त्यांनी दिले आहे़
सदस्या पल्लवी सावकारे यांनी याबाबत अनेक सर्वसाधरण सभामध्ये शिक्षण विभागाला धारेवरही धरले होते़ अनेक फाईल वर्षानुवर्षे प्रलंबित राहातात, पोषण आहाराच्या बिलांची फाईल मात्र, तत्काळ कशी मार्गी लागते या विषयावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते़
दरम्यान, या धान्यादी मालात असलेल्या कांदा-लसूण मसाल्याच्या गुणवत्तेवर अधिकच प्रश्न उपस्थित केले जात आहे़ ही पेस्ट किती दिवस वापरासाठी चांगली असते, किती दिवसात ती वापरली जाते? यासह अनेक ठिकाणी या पेस्टला बुरशी लागून जाते, अशा अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत़
पोषण आहाराच्या पुरवठ्यासाठी आता नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जात असून आता तरी शासनाने या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे शोषण व पुरवठादाराचे पोषण थांबवावे अशी मागणी होत आहे़
माल न घेता देयके दिल्या प्रकरणी पडताळणी करून कारवाई
साई मल्टिसर्व्हीसेस या पोषण आहार पुरवठादाराला १ लाख ६७ हजारांची देयके माल न घेता अदा करण्यात आली होती़ या प्रकरणात सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी चार महिन्यापूर्वी संचालक स्तरावर कारवाई संदर्भात प्रस्ताव पाठविला आहे़ या प्रस्तावाची पडताळणी करून योग्य ती कारवाई करू अशी माहिती शिक्षण संचालक प्राथमिक द़ गो़ जगताप यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली़ धान्यादी माल व देयकांबाबत शिक्षणाधिकारी व सीईओंना त्या-त्या पातळीवर अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले़
हे स्पर्धात्मक दर असतात, त्या- त्यावेळच्या मार्केटच्या परिस्थितीनुसार काही कमी काही जास्त असे ते दर असतात शिवाय निविदा प्रक्रिया ही पारदर्शकपणे होते़ त्यामुळे त्यावेळच्या मार्केटच्या परिस्थितीवर हे दर अवलंबून असतात
- द़ गो़ जगताप, शिक्षण संचालक, प्राथमिक
एकीकडे शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही व शालेय पोषण आहार या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडीत विषयात विद्यार्थ्यांचे सोडून पुरवठादाराचे पोषण सुरू असल्याचा हा प्रकार आहे़ दर दुप्पट असतानाही मालाच्या गुणवत्तेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत़ प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. - रवींद्र शिंदे,
माहिती अधिकार कार्यकर्ते