जामनेर अंगणवाडीतील बालकांना १५ मेपर्यंत पोषण आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 03:46 PM2020-04-17T15:46:18+5:302020-04-17T15:48:57+5:30
बंदच्या काळात बालकांना पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने १५ मेपर्यंत पोषण आहार वाटप करण्याचे आदेश महिला व बालकल्याण विभागाला दिले आहे.
(सय्यद लियाकत/मोहन सारस्वत)
जामनेर, जि.जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालय व अंगणवाड्या बंद करण्यात आल्या आहेत. बंदच्या काळात बालकांना पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने १५ मेपर्यंत पोषण आहार वाटप करण्याचे आदेश महिला व बालकल्याण विभागाला दिले आहे. त्यानुसार तालुक्यातील प्रकल्प एक व प्रकल्प दोनमधील ३९६ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे सदर पोषण आहार बालकाच्या पालकाला बोलून सोशल डिस्टंसिंगचे पालन करून दिला जाणार असून शून्य ते सहा वयोगटातील १६ हजार बालकांना याचा लाभ मिळणार आहे.
कोरोनाने देशात व राज्यात धुमाकूळ घातला आहे. यामुळे राज्यात ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्यादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशावेळी अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने लॉकडाऊनच्या काळातही बालकांना पोषण आहार देण्याचे निर्णय घेतला आहे. हा पोषण आहार अंगणवाडीत शिजवून दिला जाणार नसून, तो वाटप केला जाणार आहे. दोन दिवसांपासून तालुक्यात पोषण आहार वाटप करण्याचे काम सुरू झाले आहेत १५ मेपर्यंत हा पोषण आहार वाटप केला जाणार आहे. बालकाच्या पालकाना बोलून डाळी, धान्य, तेल, मीठ, गहू, तांदूळ आदींची पाकिटे दिली जाणार आहे.
सरकारचा ‘टेक होम रेशन उपक्रम’
संचारबंदीच्या काळात राज्य शासनाने ‘टेक होम रेशन’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बालकांना दिलेला पोषण आहार घरीच तयार करून त्यांना खाऊ घालण्याचे आदेशही दिले आहेत. तालुक्यात प्रकल्प एक, प्रकल्प दोन अशा एकूण ३९६ अंगणवाड्या आहेत. सर्व अंगणवाड्यांमध्ये बालकांना पोषण आहार वाटपाचे निर्देश देण्यात आले आहे.
शासनाने बालकांना पोषण आहार वाटपाचे आदेश दिले आहेत. पालकांना बोलावून नियमांचे उल्लंघन न होता सदर पोषण आहार वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे. १५ मेपर्यंत सर्व बालकांना पोषण आहार दिला जाणार आहे. अंगणवाडी सेविकेने नियमाचे पालन करून पोषण आहार वाटप करावा.
-ईश्वर गोयर, बालविकास प्रकल्प अधिकारी, जामनेर