पोषण ट्रॅकर इंग्रजीतून, ९० टक्के अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:16 AM2021-07-30T04:16:30+5:302021-07-30T04:16:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अंगणवाड्यांचे कामकाज डिजिटल व्हावे यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्यात आला आहे, मात्र, या असंख्य ...

Nutrition Tracker in English, 90% Anganwadi workers boycott | पोषण ट्रॅकर इंग्रजीतून, ९० टक्के अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार

पोषण ट्रॅकर इंग्रजीतून, ९० टक्के अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अंगणवाड्यांचे कामकाज डिजिटल व्हावे यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाइल देण्यात आला आहे, मात्र, या असंख्य अडचणींचा आधीच सामना करावा लागत असताना आता पोषण ट्रॅकर याद्वारे इंग्रजीतून माहिती भरावी लागत असल्याने अंगणवाडी सेविकांची मोठी अडचणी झाली आहे. यामुळे या पोषण ट्रॅकरवर ९० टक्के अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकला आहे. हे ॲप मराठीतून व्हावे, या मागणीसाठी आंदोलनेही केली जात असून तसा प्रस्तावही शासन स्तरावर पाठविण्यात आला आहे.

जिल्हाभरात अंगणवाड्यांमार्फत गरोदर महिला, स्तनदामाता, बालके, किशोरवयीन मुले यांची माहिती भरणे व अद्ययावत करणे अशी कामे अंगणवाडी सेविकांकडे आहे. त्यांना ही नोंदणी गेल्या दोन वर्षांपासून मोबाइलवर करावी लागत आहे. हे कामकाज आधी मराठीतून होते. मात्र, ते इंग्रजीतून सुरू झाल्यानंतर आता अंगणवाडी सेविकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. अंगणवाडी सेविकांची भरती करताना आठवी ते दहावी पासचे निकष होते. काही अंगणवाडी सेविका पदवी उत्तीर्ण आहेत. मात्र, ज्या कमी शिकलेल्या आहेत, त्यांची इंग्रजीची अडचण होत असून या ट्रॅकरवर माहिती भरणे त्यांना अवघड होत आहे. त्यामुळे हे ॲप मराठीत करावे, अशी मागणी करीत सेविकांनी बहिष्कार टाकला आहे.

मोबाइलची अडचण वेगळी

गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाडीच्या कामांची मोबाइलवर नोंद करावी लागत आहे. मात्र, यात आदिवासी भागात इंटरनेटच्या अडचणी असल्याने ही नोंदणीच होत नसल्याची तसेच अनेक मोबाइल हे नादुुरुस्त झाल्यामुळे माहितीच अद्ययावत होत नसल्याने ही मोबाइलची सर्वात मोठी अडचण समोर आली आहे. त्यामुळे यातून काहीतरी मार्ग काढावा, अशी मागणी सेविकांमधून होत आहे.

पोषण ट्रॅकरवरील कामे ठप्प

पोषण ट्रॅकरवर गरोदर माता, स्तनदा माता, बालके, किशोरवयीन मुलांची माहिती भरावी लागते. मात्र, ही माहिती आता इंग्रजीतून भरावी लागत आहे. दरम्यान, हे ॲप पूर्वीसारखे मराठीतूनच असावे, केंद्र सरकारने कोणतीही शहानिषा न करता हे कामकाज सरसकट इंग्रजीतून केले आहे. शासनानेही केंद्राचा आदेश जशाचा तशा पूर्ण राज्यभर लागू केला आहे. अंगणवाडी सेविकांचे शिक्षण कमी असताना त्यांना इंग्रजीची सक्ती करणे हा मराठीवर अन्याय असून त्यामुळे ८० टक्के कामे ठप्प असल्याचे अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अमृतराव महाजन यांनी सांगितले.

कामे कसे करणार

मोबाइलवर माहिती भरावी लागते. त्यातही ती आता इंग्रजीतून भरावी लागत असल्याने आणि त्यात माहिती भरल्यानंतर दुरुस्तीचा पर्याय नसल्याने आम्हाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. आदिवासी भागात इंटरनेटच्या पुरेश्या सुविधा नाहीत, रेंज नसणे अशा असंख्य अडचणी या कामात आहे. त्यामुळे रजिस्टर नोंदणीचा पर्याय या कामांसाठी हवा त्यामुळे आम्ही पोषण ट्रॅकवर बहिष्कार टाकला आहे. - अनिता दिलीप पिंप्राळे, अंगणवाडी सेविका

इंग्रजीतून माहिती भरणे कमी शिक्षण असलेल्यांना कठीण जाते. वारंवार माहिती अद्ययावत करणे यात अडचणीचे होते. यात गरोदर माता, स्तनदा माता, बालके, किशोरवयीन मुले यांची माहिती आम्हाला भरावी लागत आहे. यासाठी मराठीचा पर्याय असायला हवा, अशीच आमची मागणी आहे. आदिवसी भागात मोबाइल हाताळताना असंख्य अडचणी असतात, त्या शासनाने समजून घ्याव्यात. - गीता ओंकार बारेला, अंगणवाडी सेविका

कोट

पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्याचे काम हे इंग्रजीतून करायचे आहे. केंद्र सरकारने पूर्ण देशभर एक भाषा म्हणून हा पर्याय ठेवला आहे. हा विषय शासनस्तरावरचा असल्याने अंगणवाडी सेविकांच्या मागण्या त्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठविला आहे. कामकाज मराठीतून झाल्यास ते अंगणवाडी सेविकांनाही सोयीचे होईल. - आर. आर. तडवी, महिला व बालकल्याण अधिकारी, जि. प.

एकूण अंगणवाड्या : ३६४०

अंगणवाडी सेविका : ३४२०

Web Title: Nutrition Tracker in English, 90% Anganwadi workers boycott

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.