राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:12 AM2021-06-27T04:12:13+5:302021-06-27T04:12:13+5:30

खासदार रक्षा खडसे : राज्य सरकारच्या विरोधात भाजपचे चक्काजाम आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ओबीसी असो अथवा ...

OBC reservation canceled due to state government's refusal | राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द

Next

खासदार रक्षा खडसे : राज्य सरकारच्या विरोधात भाजपचे चक्काजाम आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ओबीसी असो अथवा मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी राज्य सरकारची मानसिकताच नाही. राज्य सरकारने न्यायालयात पुरावे सादर करून ओबीसींचे आरक्षण टिकवणे अपेक्षित होते. मात्र राज्य सरकारने काहीही न केल्याने ओबीसी आरक्षण रद्द झाले, असा आरोप खासदार रक्षा खडसे यांनी शनिवारी जळगावात केला.

भाजपच्यावतीने शनिवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार जळगावात भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्त्वाखाली सकाळी साडेअकरा वाजता जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्तारोको आंदोलन झाले. त्यावेळी खडसे यांनी राज्य सरकारवर टीका करीत वरील आरोप केला.

या आंदोलनात खासदार रक्षा खडसे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह नगरसेवक, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

पोलिसांची अडवणूक आणि कार्यकर्त्यांची पळापळ

सकाळी १० वाजेपासून आंदोलनस्थळी पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात होता. साडेअकरा वाजता आंदोलक महामार्गावर चक्काजामसाठी बसले. मात्र त्याच वेळी दुसऱ्या बाजूने वाहने जाऊ लागली. त्या वेळी काही कार्यकर्ते तिकडे वळले व त्यांनी वाहने अडविण्याचा प्रयत्न केला. आकाशवाणी चौकातून आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने चालून गेले व सिंधी कॉलनीकडून रिंग रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी चौकात त्यांना अडवले. तेव्हा आंदोलकांनी जागीच ठिय्या मांडून रस्त्यावरील वाहने अडवून धरली.

कार्यकर्ते चढले बसवर, वाहनांपुढे झोपून घोषणाबाजी

आंदोलनादरम्यान दरम्यान काही कार्यकर्ते थेट एसटी बसवर चढले तर काहींनी वाहनांसमोर झोपून घोषणाबाजी केली. या चौकाच्या आजूबाजूच्या रस्त्यावर वाहनांच्या चांगल्याच रांगा लागल्या होत्या. आकाशवाणी चौकातून वाहने येऊ जाऊ लागल्याने आंदोलक पुन्हा या चौकात आले व तेथे ठिय्या मांडला. एक तासानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ आंदोलनाची भूमिका मांडताना खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, ओबीसी असो किंवा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय असो, राज्य सरकारची मानसिकताच नाही. राज्य सरकारने न्यायालयात पुरावे सादर करून ओबीसींचे आरक्षण टिकवणे अपेक्षित होते. मात्र राज्य सरकारने काहीही न केल्याने आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली आहे. ओबीसी आरक्षणप्रश्नी केंद्र जबाबदार नाही, पण राज्य सरकार दिशाभूल करीत असल्याचा आरोप यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी केला.

राज्य सरकारने मराठा समाजापाठोपाठ ओबीसी आरक्षणाबाबतही निष्क्रिय भूमिका घेतल्याने दोन्ही समाजाचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला.

जिल्हाध्यक्षांचा पोलिसांवर आरोप

आंदोलन सुरू असले तरी पोलीस वाहनांना मार्ग करून देत होते. या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू असल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला.

जिल्ह्यातील आंदोलनात गिरीश महाजन गैरहजर

जिल्ह्यात आंदोलन करताना भाजपच्यावतीने एकनाथ खडसे यांच्यानंतर माजी मंत्री गिरीश महाजन हे आंदोलनांचे नेतृत्व करीत असायचे. आता चक्काजाम राज्यभरात होत असताना आपापल्या जिल्ह्यात तेथील भाजप नेत्यांना हजर राहण्याच्या सूचना होत्या. मात्र या आंदोलनात गिरीश महाजन हे गैरहजर होते. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार रक्षा खडसे यांनी केले.

कार्यकर्त्यांची जमवाजमव

आंदोलनाची वेळ सकाळी ११ वाजेची होती. मात्र वेळ होऊन त्यानंतरही कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याने त्यांची जमवाजमव केली जाऊ लागली व आंदोलनाला उशीर होत गेला. कार्यकर्ते कमी व पोलीसच जास्त अशी स्थिती आंदोलनस्थळी होती.

Web Title: OBC reservation canceled due to state government's refusal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.