ओबीसींना आरक्षण मिळायला हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:17 AM2021-09-25T04:17:08+5:302021-09-25T04:17:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ओबीसींना, महिलांना आणि रंजल्या-गांजल्यांना आरक्षण हे मिळालेच पाहिजे. महात्मा फुले यांनीही सांगितले होते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ओबीसींना, महिलांना आणि रंजल्या-गांजल्यांना आरक्षण हे मिळालेच पाहिजे. महात्मा फुले यांनीही सांगितले होते ‘कामे वाटून द्या, जातीप्रमाणे’ त्यामुळे आरक्षण मिळावे, असे प्रतिपादन शुक्रवारी सायंकाळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. महात्मा जोतिबा फुले नगराच्या नामकरण सोहळ्याप्रसंगी भुजबळ बोलत होते.
शहरातील पोलन पेठ या भागाचे नामकरण महात्मा जोतिबा फुले नगर असे करण्यात आले. पूर्वी या भागात महात्मा फुले भाजी मंडई होती. मात्र नंतर पोलन या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नावावरून या भागाला पोलन पेठ हे नाव देण्यात आले. आता पुन्हा या भागाला महात्मा जोतिबा फुले नगर असे नाव देण्यात आले आहे. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार लता सोनवणे, महापौर जयश्री महाजन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी महापौर सीमा भोळे, माजी महापौर विष्णू भंगाळे, सचिन नारळे, ज्ञानेश्वर महाजन, माजी नगरसेवक किशोर भोसले, खानदेश माळी महासंघाचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सरिता कोल्हे, सरिता नेरकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भुजबळ यांनी सांगितले की, २४ सप्टेंबर १८७३ ला महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. त्याच दिवशी हे स्मारकाचे उद्घाटन झाले आणि या परिसराला त्यांचे नाव दिले गेले. जातिभेद आणि स्त्री-पुरुष भेद नष्ट करण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले होते. त्यांनी त्या काळातच म्हटले होते कामे वाटून द्या, जातीप्रमाणे. त्यानुसार ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे. तसेच ओबीसी आरक्षणासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो, असेही भुजबळ यांनी म्हटले.
नियमांची ऐशीतैशी
मंत्री छगन भुजबळ येणार असल्याने या कार्यक्रमासाठी चांगलीच गर्दी झाली होती. व्यासपीठावरदेखील मान्यवर पुरेसे अंतर न राखता तसेच मास्क न लावता बसले होते. या कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांना पायदळी तुडवण्यात आले.