बदलीतून सवलतीसाठी दोघा शिक्षकांनी मिळविले अस्थिव्यंगाचे बनावट प्रमाणपत्र
By Admin | Published: April 26, 2017 12:22 AM2017-04-26T00:22:36+5:302017-04-26T00:22:36+5:30
दोघे 15 वर्षे ठाण मांडून : नगर जिल्ह्यातील कारवाईचा जि.प. बोध घेणार का?
जळगाव : तालुक्यातील दोन शिक्षकांनी बदलीतून सूट मिळावी यासाठी अस्थिव्यंगाबाबत बनावट प्रमाणपत्र जिल्हा सामान्य रुग्णालयातून मिळविले असून, हे प्रमाणपत्र शिक्षण विभागाकडे सादर करून त्यांची दखल घेऊन संबंधित शिक्षकांना बदलीतून सूट मिळण्यासंबंधीची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
या दोन्ही शिक्षकांपैकी एक शिक्षक हे सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दोन्ही शिक्षक जि.प.शाळांच्या सेवेत असल्यापासून जळगाव तालुक्यातच आहेत. 15 वर्षे ते तालुक्यातून बाहेर गेलेले नाहीत. शासनाने अलीकडेच अस्थिव्यंगांना बदलीतून सूट दिली जाईल, असे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाचा आधार घेऊन बदलीतून सूट मिळावी यासाठी बनावटी अस्थिव्यंगाचे प्रमाणपत्र मिळविण्याचा सपाटा शिक्षकांमध्ये सुरू आहे. नगर जिल्ह्यातही बनावटी अस्थिव्यंग प्रमाणपत्रांचा बाजार जि.प.च्या शिक्षकांनी मांडला होता. या प्रकरणाची दखल सीईओ यांनी घेतली. तेथे जि.प.च्या 30 दोषी शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
बदलीपात्र 153 ग्रामसेवकांची यादी जाहीर
जि.प.च्या ग्रा.पं. विभागाने बदलीस पात्र 153 ग्रामसेवकांची यादी जाहीर केली आहे. एकाच तालुक्यात 10 वर्षांपेक्षा अधिक सेवा केलेल्या ग्रामसेवकांची ही यादी आहे. या यादीवर संबंधितांना येत्या 28 तारखेर्पयत हरकती घेता येईल.
आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन, शुक्रवारी सुरुवात
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेला 28 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या बदल्या ऑनलाईन पध्दतीने केल्या जाणार आहेत. शिक्षकांना 28 एप्रिलपासून शिक्षण विभागाच्या पोर्टलवर आपली सर्व माहिती ऑनलाईन पध्दतीने भरावयाची असल्याची माहिती जि.प.प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी दिली.