आधार-शिधापत्रिका लिंकिंगमध्ये कोरोना संसर्गाचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:26+5:302021-06-20T04:12:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ उपक्रमाअंतर्गत शिधापत्रिकेशी आधार कार्ड लिंक केले जात असून जिल्ह्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ उपक्रमाअंतर्गत शिधापत्रिकेशी आधार कार्ड लिंक केले जात असून जिल्ह्यात २४ लाख लाभार्थ्यांचे रेशन कार्ड व आधार लिंकिंग झाले आहे. ८५ टक्के हे काम झाले असून शिधापत्रिकेतील किमान एका सदस्याचे तरी आधार लिंक झाल्याचे प्रमाण ९८ टक्क्यांच्या पुढे गेले आहे. या कामामध्ये मात्र आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम होऊन हे काम खोळंबले होते. आता ते पुन्हा सुरू झाले असून १०० टक्के लिंकिंगसाठी प्रयत्न केले जात असल्याचे पुरवठा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत आपल्या रेशन कार्ड द्वारे कुठूनही धान्य खरेदी करता येणार आहे. यासाठी रेशन कार्डशी आधार कार्ड जोडणे आवश्यक करण्यात आले आहे.
कोरोनामुळे अडथळा
वन नेशन वन रेशन कार्ड योजनेसाठी जिल्ह्यात शिधापत्रिका व आधार कार्ड लिंक करण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना स्थितीमुळे या लिंकिंगमध्ये अडथळे निर्माण झाले. आधार क्रमांक लिंक करताना लाभार्थ्याचे ठसे घ्यावे लागत असल्याने संसर्ग होऊ नये म्हणून हे काम थांबविण्यात आले. परिणामी सर्व आधार कार्डचे शिधापत्रिका लिंक होऊ शकल्या नाही. गेल्या वर्षी हा संसर्ग कमी झाल्यानंतर हे काम पुन्हा सुरू करण्यात आले. यात जिल्ह्यातील एकूण २८ लाख एक हजार १९४ लाभार्थीपैकी २४ लाख लाभार्थ्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिकेची लिंक झालेले आहे. हे प्रमाण ८५ टक्के असून शिधापत्रिकेतील किमान एका सदस्याचे तरी आधार लिंक केलेल्या शिधापत्रिकांची संख्या पाच लाख ९१ हजारपर्यंत पोहोचली असून ९८ टक्के हे काम झाले आहे. हे काम सुरू असताना यंदाही पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली व पुन्हा यात अडथळे आले. त्यामुळे हे काम थांबले होते. आता ते पुन्हा सुरू झाले आहे.
आधार लिंकिंगची स्थिती -
एकूण लाभार्थी -२८,०१,१९४
- आधार लिंक झालेले लाभार्थी २४,०००००
- टक्केवारी ८५ टक्के
- एकूण रेशन कार्ड ६,०६,२६९
- किमान एक सदस्याचे आधार लिंक असलेले कार्ड- ५,९०,७१७