महामार्गाच्या कामातील अडथळे संबंधित यंत्रणांनी तातडीने दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:41 AM2021-01-13T04:41:00+5:302021-01-13T04:41:00+5:30

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामातील अडथळे सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने दूर करावे. जेणेकरुन महामार्गाचे काम गतीने पूर्ण करता ...

Obstacles in highway work should be removed immediately by the concerned authorities | महामार्गाच्या कामातील अडथळे संबंधित यंत्रणांनी तातडीने दूर करा

महामार्गाच्या कामातील अडथळे संबंधित यंत्रणांनी तातडीने दूर करा

Next

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामातील अडथळे सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने दूर करावे. जेणेकरुन महामार्गाचे काम गतीने पूर्ण करता येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केल्या.

शहरातील रस्ता सुरक्षा व ३२ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे चंद्रकांत सिन्हा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) किरण सावंत पाटील, महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे, उपअभियंता स्वाती भिरुड यांचेसह एसटी, वीज वितरण कंपनी, भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी वीज वितरण कंपनीने रस्त्यावरील जुन्या लाईन व पोल तातडीने काढून घ्यावेत. त्याचबरोबर महानगरपालिकेने महामार्गावरील अतिक्रमण तातडीने हटवावे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ महापालिकेच्या घंटागाड्या घनकचरा संकलनासाठी रस्त्यावर उभ्या असतात ते इतरत्र हलवावे. त्याचबरोबर महामार्गावर स्ट्रीटलाईट बसविण्यासाठी नगरोत्थान अथवा जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळणेबाबतचा प्रस्ताव महापालिकेने तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्या केल्या.

त्या विक्रेत्यांवर कारवाई करा

अजिंठा चौफुलीपासून पुढे रस्त्यावरच ट्रक दुरुस्तीचे काम केले जाते, महामार्गाच्या दोन्ही बाजूस विक्रेते दुकान मांडून वस्तुंची विक्री करतात. त्यामुळेही वाहतुक कोंडी होवून रस्ताच्या कामात अडथळे येतात. याबाबत पोलीस, परिवहन व महापालिकेने संयुक्त कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

तातडीने खड्डे बुजवा

महापालिकेमार्फत शहरातील रस्त्यांची कामे करतांना अमृत योजना, पाणीपुरवठा व मल:निस्सारणाची कामे करताना रस्ते खोदतांना नागरीकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो दोन्ही कामे एकाचवेळी होतील याबाबत नियोजन करावे. त्यानंतरच रस्त्यांची दुरुस्ती करावी. रस्ते दुरुस्ती अथवा नवीन रस्ता बनविल्यानंतर रस्ते खोदू नये. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्यात.

वाहनचालकांनी वाहतुक नियमांचे पालन करावे

जिल्ह्यात यावर्षी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या काळात राबविण्यात येणार आहे. या अभियानात परिवहन विभाग, एसटी महामंडळ, पोलीस विभाग विभागाने वाहनचालकांच्या समुपदेशानासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. वाहतुक नियमांची प्रचार व प्रसिध्दी करावी. वारंवार होणाऱ्या अपघाताची ठिकाणे निश्चित करुन तेथे सुरक्षेचे उपाय योजावेत. वाहनचालकांची आरोग्य तपासणी, डोळे तपासणी सारखे उपक्रम राबवावेत. वळण रस्तांवर रिप्लेक्टर लावावे, वाहनांची गती राखण्याबाबतचे चिन्हे लावातील. त्याचबरोबर नागरीकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन स्वत:ची व कुटूंबाची काळजी घ्यावी. बेफिकिरपणे वाहन चालवून इतरांना त्रास होणार नाही याबाबत नागरीकांनी काळजी घ्यावी, दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.

Web Title: Obstacles in highway work should be removed immediately by the concerned authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.