जि.प.सभापतींचे वाहन अडवून धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:40 AM2019-02-03T11:40:39+5:302019-02-03T11:40:59+5:30
गेंदालाल मिलमधील घटना
जळगाव : जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती दिलीप पाटील यांचे सरकारी वाहन अडवून त्यांच्याशी काही टवाळखोरांनी मद्याच्या नशेत धुडगूस घातल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडे सात वाजता गेंदालाल मील भागात घडली.
दरम्यान, पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याचे संभाव्य घटना टळली. धुडगूस घालणारे काही जण पळून गेले तर जुबेर नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही.
जिल्हा परिषदेतील कामकाज आटोपल्यानंतर सभापती दिलीप पाटील व त्यांचे भाऊ चंद्रशेखर पाटील हे सरकारी वाहनाने निवृत्ती नगरात बहिणीकडे जात असताना गेंदालाल मीलमध्ये रस्त्यावर काही टवाळखोर हुज्जत घालत होते. पाटील यांचे वाहन तेथे हळू झाले असता त्यातील दोन जणांनी वाहनाशी छेडछाड केली. हा प्रकार पाहिल्यानंतर दिलीप पाटील वाहनाच्या खाली उतरले असता टवाळखोर त्यांच्या अंगावर धावून गेले तर एका जणाने गर्दीत चंद्रशेखर पाटील यांच्या खिशात हात टाकून पैसे लांबविण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पाटील यांनी शहर पोलिसांशी संपर्क करुन घटनेची माहिती दिली. निरीक्षक एकनाथ पाडळे, सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, अमोल पाटील, संजय शेलार आदी कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळावर पोहचला. पोलीस आल्याचे पाहून टवाळखोर पळून गेले, मात्र एका जणाला पकडण्यात आले.